उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 11:42 AM2019-11-01T11:42:30+5:302019-11-01T11:43:41+5:30
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. शरद गडाख यांचे प्रतिपादन
आॅनलाइन लोकमत
धुळे : आजचे बदलते हवामान पाहता अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी सुधारित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यामुळे अधिकाधिक उत्पन्न व उत्पादन घेणे शक्य होऊ शकेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ.शरद गडाख यांनी आज येथे केले.
कृषी महाविद्यालय धुळे, कृषी विज्ञान केंद्र आणि विभागीय विस्तार केंद्र धुळे, कृषी विभाग,आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्टÑीय कृषी विकास योजना (शेतकरी प्रथम) व धुळे-नंदुरबार अंतर्गत आयोजित कृषी तंत्रज्ञान दिन, शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षपदावरून डॉ. गडाख बोलत होते.
व्यासपीठावर कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. पंकज कुमार महाले, शिक्षण संचालक डॉ. अशोक फरांदे, कृषी महाविद्यालय धुळेचे सहयोगी अधिष्ठता डॉ. अशोक मुसमाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे, डॉ. मुरलीधर महाजन, डॉ. चिंतामणी देवकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्यावेळी प्रगतीशील शेतकरी श्रीराम पाटील, प्रकाश पाटील, हिंमतराव माळी, वसंतराव पाटील या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. गडाख पुढे म्हणाले की, बदलत्या हवामानात जास्त उत्पादन येण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे विकसीत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठाने १२० पिकांवर संशोधन करून २६३ वाण, ३६ यंत्र व अवजारे विकसीत केल्याचे त्यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. अतिवृष्टी व नुकसानीबाबत माहिती देवून माती व पाणी यांचे होणारे प्रदूषण आणि मातीची होणारी झीज टाळण्यासाठी शेतकºयांनी उपाययोजना कराव्यात असे डॉ. अशोक फरांदे यांनी सांगितले. तर कृषी विद्यापीठाद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विविध मोबाईल अॅप तयार केल्याची माहितीही शेतकºयांना दिली.
कृषी विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहचविणे हाच या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे डॉ. अशोक मुसमाडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तांत्रिक चर्चासत्र झाले. गहू उत्पादन तंत्रज्ञानाबाबत डॉ. सुरेश दोडके, रब्बी कांदा उत्पादन तंत्रज्ञानाबाबत डॉ. श्रीधर देसले, मका पिकातील अमेरिकन लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉ. पंकज पाटील, कापूस पीक व्यवस्थापन यावर डॉ. मुरलीधर महाजन तर डाळींब पीक व्यवस्थापनावर डॉ. दिनेश नांद्रे यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.