गुजरातमधील उसतोड मजुर स्वगृही परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:48 PM2020-04-29T22:48:11+5:302020-04-29T22:48:53+5:30
पिंपळनेर/नेर : राज्याच्या सीमा बंद असतांनाही चोरवाटेने आणले वाहन, पहाटे मजुरांना गावाबाहेर सोडून चालक रवाना
पिंपळनेर /नेर: ऊस तोडण्यासाठी गुजरात राज्यात गेलेले पिंपळनेर व नेरभदाणे येथील मजुर आज गावाकडे परतले. दुसऱ्या राज्यातून आलेल्या या मजुरांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली. तर नवे भदाणे येथील मजुरांना साक्रीपासून आपल्या गावापर्यंत पायी प्रवास करावा लागला.
पिंपळनेर
येथील काकासट भिल वस्तीमधील ९६ ऊसतोड मजुरांसह ४४ लहान बालके असे एकूण १४० जणांना कारखान्याच्या वाहनाने परस्पर सोडून गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. तहसीलदार विनायक थवील व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना या घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर सर्व मजुरांची तपासणी ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आली. तपासणीनंतर ग्रामपंचायतीतर्फे मजुरांना आपल्या गावाकडे सोडण्यात आले.
पिंपळनेर येथील काकासट भिल वस्तीमधील नागरिक गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यातील सायन साखर कारखान्यासाठी मजूर ऊस तोडण्यासाठी गेले होते. या सर्व मजुरांना आज पहाटे चार वाजेच्या सुमारास शहरापासून काही अंतरावर नवापूर रस्त्यालगत दोन वाहनातून सोडण्यात आले. यासंदर्भात ऊसतोड मजुरांना कोणत्या रस्त्याने आले, कसे आले असे विचारले असता, ट्रक संपूर्ण ताडपत्रीने झाकलेला होता. गाडीत झोपून राहा गप्पा करू नका, असे सांगण्यात आले होते. यामुळे ट्रक कोणत्या रस्त्याने येत होता हे आम्हाला सांगता येणार नाही असे त्यांनी सांगितले.
सायन येथून या मजुरांना रात्री सात ते आठ या दरम्यान ट्रकमध्ये बसवून चालकांने त्यांना पिंपळनेर गावाबाहेर सोडून गेल्याचे या ऊसतोड मजुरांनी सांगितले. सदर माहिती ही स्थानिक नागरिकांनी तहसीलदार विनायक थविल व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना कळविली. यानंतर तात्काळ याठिकाणी पोलीस येऊन व महसूल खात्याचे प्रतिनिधी तसेच सरपंच साहेबराव देशमुख, उपसरपंच विजय गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गांगुर्डे, ग्रामविस्तार अधिकारी डी. डी. चौरे यांनी या ऊसतोड मजुरांकडून माहिती जाणून घेतली, .सर्व मजुरांना येथील ग्रामीण रुग्णालय राकेश मोहने व व वैद्यकीय पथक यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे.
मजुरांची संख्या ९६ असून, व त्यांच्यासोबत ४४ लहान मुले मुली, असे आहेत., या सर्वांना दोन ट्रकांद्वारे भल्यापहाटे शहरापासून काही अंतरावर सोडून देण्यात आले. दरम्यान आम्हाला रात्री कुठेही जेवण मिळाले नाही असे या मजुरांनी सांगितल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या मजुरांना बिस्किटांचे वाटप केले. दरम्यान शहरात प्रवेश करणारे सर्वच चेक पोस्ट, बंद असल्याने मजुरांना घेऊन ओली वाहने ही शहरापर्यंत आलीच कशी? मजुरांना सोडून ही वाहने परत गेली कशी यासंदर्भात उलटसुलट प्रश्न निर्माण होत आहेत. तर ग्रामपंचायत पिंपळनेर यांच्यावतीने या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी झाल्यानंतर आपापल्या गावी सोडण्यात आले.