धुळ्यात जनावरे वाहून नेणारे वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 06:08 PM2019-03-18T18:08:23+5:302019-03-18T18:09:31+5:30
कमलाबाई चौक : अवैधरित्या होणारी वाहतूक पोलिसांनी रोखली
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील साक्री रोडवरुन जनावरांचे अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन कमलबाई चौक शहर पोलिसांनी सापळा लावून पकडले़ पाच जनावरांची सुटका केली असून वाहनांसह २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली़
याप्रकरणी पोलीस नाईक प्रल्हाद वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ साक्री रोडवरुन कृषी उत्पन्न बाजार समितीकडे अवैधपणे जनावरांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने कमलाबाई शाळेच्या चौकात सापळा लावला़ रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एमएच १८ एए ४३१७ क्रमांकाचे वाहन संशयास्पद जाताना आढळून आले़ हे वाहन थांबविण्यात आले़ वाहनाची तपासणी केली असता २ गायी आणि ३ बैल असे ५ जनावरे आढळून आली़ वाहनचालक दीपक दगडू मोरे (३२, रा़ लाला सरदार नगर, एकविरा देवी मंदिराजवळ, देवपूर) याला ताब्यात घेण्यात आले़ त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे जनावरांच्या खरेदी-विक्री व्यवहाराबाबतची कोणतीही पावती अथवा कागदपत्रे आढळून आली नाही़ त्याने लाला कुरेशी (रा़ कॉटन मार्केट परिसर) याच्या मालकिची जनावरे असल्याचे सांगितले़
वाहनात पुरेशी जागा नसताना कोंबून वेदनादायी पध्दतीने वाहनात उभे करुन वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त गुरे भरुन वाहतुकीचा परवाना नसताना गुरांची वाहतूक करताना मिळून आला़ पोलिसांनी १ लाख ५० हजाराची वाहने आणि ६० हजाराची जनावरे असा एकूण २ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ याप्रकरणी चालकासह दोघांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सिध्दार्थ इंगळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, नाना आखाडे, मुक्तार मन्सुरी, पी़ व्ही़ खैरमोडे, के़ एस़ सूर्यवंशी यांनी केली आहे़ पुढील तपास सुरु आहे़