वाहन विक्रीचे पैसे मागविल्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 08:17 PM2019-04-17T20:17:46+5:302019-04-17T20:19:11+5:30
तिघांविरुध्द गुन्हा : जखमीवर उपचार सुरु
धुळे : वाहन विक्रीचे पैसे मागविल्याच्या कारणावरुन तिघांनी एकास मारहाण केली़ हाताबुक्यांसह लोखंडी रॉडचा वापर झाल्याने दुखापत झाली आहे़ ही घटना सोमवारी घडली़ आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़
शहरातील मिल्लत नगरातील सार्वजनिक हॉस्पिटलजवळ राहणारे ओसामा मोहम्मद निहाल अन्सारी (२६) यांचे नाश्ताचे दुकान आहे़ या तरुणाने त्यांची कार दोन महिन्यांपुर्वी १ लाख ५० हजार रुपये किंमतीला सलीम शहा यांना विकली होती़ ते पैसे मागत असताना या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली़ त्यांच्यासह अन्य दोघांनी शिविगाळ करत संगणमत करुन हाताबुक्यांनी मारहाण केली़ जिवे ठार मारण्याची धमकी देत लोखंडी सळईने डोक्यावर मारुन दुखापत केली़
ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी ओसामा मोहम्मंद निहाल अन्सारी यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, सलीम शहा सईस शहा, गणीशहा चांदनियाज शहा, पर्न्या (पूर्ण नाव माहित नाही) या तिघां संशयितांविरुध्द भादंवि कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस हेड कॉन्स्टेबल आऱ डी़ जाधव घटनेचा तपास करीत आहेत़
दरम्यान, अचानक घडलेल्या घटनेमुळे मिल्लत नगरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़