मुख्य रस्त्यावर गुरांच्या ‘मॅरेथॉन’ चे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 11:17 PM2020-01-03T23:17:45+5:302020-01-03T23:18:28+5:30
दुर्लक्ष : महापालिका प्रवेशव्दाराबाहेर स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून पहारा; समस्या सुटत नसल्याची नाराजी
धुळे : मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढल्याने धुळेकरांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असते. तरीसुद्धा मनपा प्रशासनाकडून पशुपालकावर कठोर कारवाई का केली जात नाही़, असा प्रश्न पडतो. दररोज मुख्य रस्त्यावर गुरांची मॅरेथान पाहावयास मिळत आहे़
शहरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी विद्यमान आमदार फारुख शाह यांच्यासह सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांकडून महासभेत वारंवार केली जात आहे़ मात्र तरीही हा प्रश्न सोडविण्यात मनपाला अद्याप यश मिळविता आलेले नाही़ शहरातील पाच कंदील, कमलाबाई हायस्कूल चौक, सिग्नल चौक, महात्मा गांधी चौक अशा महत्त्वाच्या रहदारीच्या मुख्य रस्त्यांवर व चौकात गुरे बिनदिक्कतपणे फिरताना दिसतात़ फेरीवाले उरलेला सडका भाजीपाला चौकात फेकतात त्यामुळे त्याठिकाणी मोकाट जनावरांची जास्त गर्दी होते. दिवसभर दत्तमंदिर चौक ते थेट बारापत्थर, शिवाजी महाराज चौकापर्यंत सतत गुरांमुळे वाहतूकीची कोंडी होतांना दिसते.
मनपाकडे कोंडवाडाच नाही
डिसेंबर महिन्यात मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपाकडून ठेका देण्यात आला आहे़ मात्र ठेका केवळ नावालाच असल्याने आजही गुरांचा वावर दिसून येतो़ मनपाकडे जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात येते़ त्यानतंर गुरांच्या मालकावर कारवाई केली जाते़ मनपाकडे कोंडवाडा नसल्याने एका वर्षापासुन आरोग्य विभागाकडून कोणतेही कारवाई केलेली दिसुन येत नाही़ तशी या विभागाकडे कारवाईची नोंदही नाही.
वाहतुक कोंडीचा मनस्ताप
मुख्य रस्त्याच्या मध्यभागी मोकाट गुरे रस्त्यावर बसतात़ त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. काही रस्त्यावर अचानकपणे हे मोकाट गुरे रस्ता ओलांडत असल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत. मोकाट गुरांमुळे मुख्य चौकात सकाळ-संध्याकाळ वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार दिसून येतात.
मनपाचे पथक नावालाच
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी पथक नियुक्त केले जाते़ या पथकात मुकादम, स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असतो़ पथका कोणतीही कारवाई केली जात नाही़ केवळ रस्त्यावर बसलेल्या गुरांना उठवले जाते़
चारा विक्रेत्यांच्या त्रास
पाचकंदील चौक, पाटबाजार, दत्तमंदिर, पारोळा रोड, साक्रीरोड भागात आणि इतरही भागात गुरे फिरताना दिसते. सकाळी चारा विक्रेते आग्रारोडवर दिसतात. त्यांच्या मागे ही मोकाट गुरे फिरतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा देखील होतो. हे चारा विक्रेत्यांना व्यापारी पैसे देऊन या मोकाट गुरांना चारा टाकण्यास सांगतात. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भरच पडते.