व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत मतदारांचे प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:50 AM2018-12-24T11:50:53+5:302018-12-24T11:51:22+5:30
साक्री तालुका : आष्टाणे येथे शुभारंभ, इव्हीएमद्वारे डमी मतदान घेऊन जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिन (इव्हीएम) व व्हीव्हीपॅट या मतदान घेण्याच्या यंत्रांबाबत जिल्हा निवडणूक विभागातर्फे मतदारांचे प्रबोधन करण्याच्या कार्यक्रमास रविवारी तालुक्यातील अष्टाणे येथे प्रारंभ झाला. युवा मतदारांंपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत साºयांनी डमी मतदानात सहभाग नोंदविला. या यंत्रांची माहिती देऊन मार्गदर्शनही करण्यात आले.
तालुक्यात २३ ते २८ डिसेंबर या कालावधीत गावोगावी हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून अष्टाणे येथे त्याचा रविवारी सकाळी शुभारंभ झाला. यावेळी तहसीलदार संदीप भोसले, नायब तहसीलदार (निवडणूक) व्ही.डी. ठाकूर, अनिल जोणे, प्रवीण मोरे, सर्व मंडळाधिकारी, तलाठी व पथकातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार भोसले यांनी या दोन्ही यंत्रांसह त्यांच्या कार्य पद्धतीबाबत नागरिकांना माहिती दिली. त्यांनी उपस्थित केलेल्या शंका, प्रश्नांचे उत्तर देऊन त्यांचे समाधान केले.
आपण ज्या उमेदवारास मतदान केले त्यालाच ते जात असल्याची खात्री करण्यासाठी यावेळी डमी मतदानही घेण्यात आले. मतदान केल्यानंतर ते ज्या उमेदवाराला केले त्याचा अनुक्रमणिका क्रमांक, त्याचे नाव व चिन्ह हे दर्शविणारी चिठ्ठी व्हीव्हीपॅट यंत्रावर दिसते. त्यानंतर ती सिलबंद कप्प्यात जाते. याबाबत मतदारांनी प्रत्यक्ष खात्री केली.
यावेळी गावाच्या सरपंचांसह ग्रा.पं.चे सर्व पदाधिकारीव नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील विविध गावांसाठी ११ पथके नेमण्यात आली आहेत. ती सोमवार २४ रोजी विविध गावांमध्ये जाऊन या यंत्रांद्वारे मतदानाबाबत प्रबोधन व जनजागृती करणार आहेत. त्यासाठी गावोगावी दवंडीद्वारे नागरिकांना माहिती दिली जात असल्याचे तहसीलदार भोसले, नायब तहसीलदार ठाकूर यांनी दिली.
आष्टाणे गावात आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील वयोवृद्ध महिलांपासून तरुणी व तरुणांनीही याची माहिती जाणून घेतली तसेच त्याचा वापर कशापद्धतीने केला जाणार आहे, हे सुद्धा काळजीपूर्वक जाणून घेतले.