गाव पाणीदार होण्यासाठी घेतला पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:32 AM2019-03-08T11:32:12+5:302019-03-08T11:33:21+5:30
विंचुरच्या पोलीस पाटील भारती बोरसे यांची कामगिरी : महिलांसह विद्यार्थी, ग्रामस्थांचीही मिळतेय साथ
रवींद्र बोरसे ।
विंचूर : नोव्हेंबर २०१८ ला विंचूर गावासाठी पोलीस पाटील म्हणून नियुक्त झालेल्या भारती सुरेश बोरसे यांनी विंचूर गाव परिसर पाणीदार होण्यासाठी पुढाकार घेऊन पानी फाऊंडेशनच्या कामास जोमाने सुरवात केली आहे. त्यांना इतर महिलांची मोलाची साथ मिळत आहे.
प्राचीन काळापासून गावचा प्रमुख कारभार सांभाळणारे हे पद आतापावेतो पुरूषांची मक्तेदारीच समजली जायाची. मात्र महाराष्ट्र ग्राम अधिनियम १९६७ नुसार महिलांना आरक्षण मिळाले. त्यामुळे महाराष्टÑात पोलीस पाटीलपदी अनेक महिलांची नियुक्ती झाली. शासनाचे कान व डोळे समजल्या जाणाऱ्या या पोलीस पाटीलपदास महिलांच्या पुढाकाराने वेगळे स्थान व महत्त्व प्राप्त झाल. विंचूर गावासाठी हे पद महिलेसाठी आरक्षित होते. यासाठी गावातील दहा महिलांनी अर्ज दाखल केला होता. त्यातुनच भारती बोरसे यांची शासन प्रक्रियेद्वारे विंचुर गावच्या पोलीस पाटील नियुक्ति झाली.
पती सुरेश व मुलगा प्रणव यांचेसहीत गावातील मान्यवर पदाधिकारी यांनीही कौतुक केले.
पोलीस पाटीलपदाचा मान मिळाला तरी आपण कसलीही अभिलाषा न ठेवता मिळालेल्या पदाचा व सन्मानाचा लोकोपयोगी कामासाठी सदुपयोग करावा हे त्यांनी ठरविले. गावातील शिवार फेरीला सहपरिवार हजर राहून स्वत: टिकाव हातात घेत महिलांच्या सोबतीत आधी स्वत: शोषखड्डे खोदून श्रम दानाच महत्व समजून सागत आहे. त्यांच्या या पुढाकारास पतीचीही साथ मिळाली आहे. अंगणवाडी सेविका रत्ना पगारे व इतर महिला व विद्याथीर्नी सोबतीला आहेत.
अर्थात पुरूष व ग्रामस्थ यांचाही सहभाग या कामात आहे. पानी फाऊंडेशनची जादुई कांडी गावात फिरावी व लोकसहभागातून पिण्याच्या व शेतीसाठीचा पाणीप्रश्न कायमचा सोडावा यासाठी अनेकजण पाणीदार कामगिरी करत आहेत.
विंचूर गावात पाणी टंचाई
विंचूरसहीत अनेक गावांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून विशेषत: उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली ती आपण सर्वांनी मिळून दूर केली तर यातुन इतरही समस्या आपोआप दुर होतील. पावसाळा कमी झाला तरी पाणी वापराचे नियोजन केले तरीही दुष्काळी परिस्थिती गावापासून दूरच राहते हे पानी फाऊंडेशन वॉटरकप स्पर्धेद्वारे होणाऱ्या प्रशिक्षणातून मला समजले असे त्यांनी सांगितले.
पाणी फाऊंडेशनचे मार्गदर्शन..
पानी फाऊंडेशनच्या महिलासाठीच्या बैठकीत गेले असता तेथील मार्गदर्शनाने त्या प्रभावित झाल्या. त्यांनी पाणी फाऊंडेशन वॉटरकप स्पर्धेचे चार दिवसीय निवासी प्रशिक्षण सार्वे येथे पूर्ण केले. पाणीदार गाव होण्यासाठी लोकांना जोडणारा खरा व सोपा पर्याय म्हणजेच वॉटरकप स्पर्धेत सहभागी होणे हे समजून घेत महिला व शाळेतील मुलांना एकत्र आणले.