ग्रामस्थांनी स्वच्छतेची चळवळ गतिमान करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 09:41 PM2019-01-01T21:41:28+5:302019-01-01T21:41:52+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. : स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी केले प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी स्वच्छतेची चळवळ गतिमान करावी. या स्पर्धेच्या माध्यमातून गावपातळीवर स्वच्छताविषयक सवयींमध्ये सातत्य राखण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., यांनी आज येथे केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत १ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा औपचारीक शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल उपस्थित होते. गंगाथरण डी म्हणाले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाभार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. सामुदायिक शौचालयांचा वापर करणाऱ्या लाभार्थ्यांनी तत्काळ शौचालय बांधकाम करून, प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घ्यावा. सुंदर शौचालय रंगवून स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. मधुकर वाघ यांनी प्रास्ताविकेतून स्पर्धेची माहिती दिली. पाणी गुणवत्ता तज्ज्ञ विजय हेलिंगराव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कक्षातील तज्ज्ञ व सल्लागार यांनी परिश्रम घेतले.