कलवाडे रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 06:59 PM2020-09-10T18:59:55+5:302020-09-10T19:00:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा- साक्री रस्ता मालपूर गावाच्या पुढे अमरावती मध्यम प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात गेल्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा- साक्री रस्ता मालपूर गावाच्या पुढे अमरावती मध्यम प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात गेल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील वैंदाणे गावाचा व साक्री तालुक्यातील इंदवे गावाचा शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावाशी दररोजचा होणारा संपर्क तुटला आहे. यामुळे दोन जिल्हा व तीन तालुके दुरावले आहेत. याला पर्याय म्हणून कलवाडे फाट्यापासुन भटाई विहीर रस्ता देखील सुमारे ३ किलोमीटर कच्चा तयार केला आहे. मात्र, पुढील दोन किलोमीटरचे काम रखडल्याने या गावातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील वैंदाणे गावाचे अंतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
या रस्त्याचे काम सुमारे पाच वर्षांपासून रखडलेले असल्यामुळे नंदुरबार व धुळे जिल्हा तसेच शिंदखेडा साक्री व नंदुरबार असे तीन तालुक्यांच्या सिमा देखील दुरावल्या आहेत. हे रखडलेले काम मार्गी लागल्यास या सिमा एकमेकांना जोडल्या जावुन जवळील दोंडाईचा बाजारपेठेचे अंतर देखील यामुळे कमी होणार आहे.
या रस्त्यावर अमरावती मध्यम प्रकल्पापुर्वी मोठी वर्दळ असायची ती या रस्त्याच्या अभावी कमी झाली आहे. तसेच मालपुर येथील शेतकऱ्यांना कलवाडे, वैंदाणे, इंदवे शिवारातील शेतीचा रस्ता देखील यामुळे उत्तम होणार आहे. मात्र पाच वर्षांपासून केवळ दोन किलोमीटर रस्त्याचे काम रखडल्याने हा तयार झालेला भटाई विहीरपर्यंतचा रस्ता देखील वापराअभावी नादुरुस्त झाला असून यामुळे झालेला खर्च देखील वाया जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. म्हणून रखडलेला या दोन किलोमीटर रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी या तीनही तालुक्यातील ग्रामस्थांची आहे. हा रस्ता दर्जेदार झाल्यास अमरावती मध्यम प्रकल्पाच्या शिरो पॉर्इंटवर अवजड वाहन, आधुनिक यंत्रे घेवुन जाणे देखील सोयीस्कर ठरणार आहे. तसेच या प्रकल्पाची देखभाल दुरुस्तीसाठी हा रस्ता सोयीचा होणार आहे.