विठू माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी केली अलोट गर्दी
By Admin | Published: July 4, 2017 12:56 PM2017-07-04T12:56:09+5:302017-07-04T12:56:09+5:30
विठ्ठल नामाचा रे टाहो : गल्ली क्रमांक 4 च्या दिंडीने वेधले लक्ष
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.4 - टाळ, मृदुंगाचा होणारा आवाज..भाविकांच्या मुखातून निघालेला विठू माऊलींचा गजर..त्यात भजनी मंडळांनी सादर केलेल्या भजनांद्वारे तयार झालेल्या मंगल वातावरणात हजारो भाविकांनी मालेगावरोडवरील विठ्ठल मंदिरात विठू माऊलींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.
आषाढी एकादशीनिमित्त शहरातील मालेगावरोडवर असणा:या विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीचा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
धार्मिक कार्यक्रम
प्रारंभी मंगळवारी पहाटे चार वाजता विठ्ठलाच्या मूर्तीवर दूधाने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर काकडा आरती झाली. यावेळी मंदिराचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. पहाटे विठ्ठलाची महापूजा झाल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. विठ्ठल मंदिरात तालुक्यातील विविध भागातून भाविक पायी चालत मंदिरात येत होते. यानिमित्ताने अग्रसेन चौक व दसेरा मैदानापासून मंदिराकडे जाणा:या वाहनांना प्रवेशास बंदी घालण्यात आली. मंगळवारी दिवसभर शहरातील काही मित्र मंडळातर्फे मंदिरात साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
मिरवणुकीने वेधले लक्ष
गल्ली क्रमांक चारमधील विठ्ठल रुख्मिणी मंदिरातर्फे सकाळी दिंडी काढण्यात आली. यात सहभागी झालेल्या महिलांनी पारंपरिक फुगडय़ांचा खेळ सादर करत सर्वाचे लक्ष वेधून घेतले.