विद्यार्थ्यांकडून गावागावात मतदार जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 09:56 PM2019-09-24T21:56:20+5:302019-09-24T21:56:40+5:30
विविध घोषणा : मतदानाची दिली शपथ; वक्तृत्व, निबंध स्पर्धा
धुळे : मतदारांमध्ये जागृती व्हावी यासाठी विविध शैक्षणिक संस्थांमधून गावागावात रॅली, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषणा आदींचे आयोजन करुन ग्रामस्थांना मतदानाचे महत्त्व सांगितले जात आहे.
नेर येथे रॅली
नेर - येथील न्यू इंग्लिश स्कूल व आर्टस् कॉमर्स ज्युनिअर कॉलेज येथे मतदार जनजागृती कार्यक्रमात निबंध स्पर्धा तसेच उमेदवार कसा असावा यावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानंतर गावातून विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. दोन्ही स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदविला. कार्यक्रमास विस्तार अधिकारी संजय विभांडीक, केंद्रप्रमुख निर्मला कदम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक नवल पाटील, एस.एम. जागीरदार, देविदास येलवे यांनी उमेदवार कसा असावा यावर मार्गदर्शन केले. प्रविण पारधी, पी.एन. बोढरे, सुरज खलाणे यांनी मतदार जनजागृतीविषयी माहिती दिली.
वडजाई येथे प्रभातफेरी
वडजाई- येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीसाठी प्रभातफेरी काढली. यावेळी विविध घोषणाचे फलक विद्यार्थ्यांच्या हातात दिसुन येत होते. शाळेच्या पटांगणापासून रॅलीला सुरुवात होवून गणपती चौकात रॅली थांबुन ग्रामस्थांना मतदाना विषयी शिक्षक मुरलीधर नानकर यांनी मतदान का करावे या विषयी थोडक्यात माहिती देऊन शपथ दिली. यानिमित्त जनजागृतीवर पत्र लेखन करुन गावकऱ्यांना वाटण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख दिलीप ठाकरे, मुख्याध्यापक प्रविण भदाणे, शिक्षिका सोनाली हिरे उपस्थित होते.
मोहाडीत स्पर्धा
विंचूर - मोहाडी उपनगरातील यशवंत कृषी माध्यमिक विद्यालय येथे मतदान जनजागृती अभियान कार्यक्रम मंगळवारी झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर.एल. मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी पी.टी. शिंदे उपस्थित होते. विद्यालयात निबंध, पत्रलेखर्न, रांगोळी, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य व इ.व्ही.एम. मशीनद्वारे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया कशी होते याबाबत कार्यक्रम झाला. परिसर फेरी काढून मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यात आले.