५१ गट आणि १०९ गणात मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 11:14 PM2020-01-06T23:14:10+5:302020-01-06T23:14:48+5:30
१ हजार २५५ मतदान केंद्रावर मतदान
धुळे : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मंगळवारी सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच वाजेदरम्यान एकूण ५१ गट आणि १०९ गणात मतदान होणार आहे. चारही तालुक्यातील १ हजार २५५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. निवडणुकीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ.सुभाष भामरे आणि राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह विद्यमान भाजप आमदार जयकुमार रावल, काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील आणि माजी आमदार अमरिशभाई पटेल, राजवर्धन कदमबांडे यांचे राजकीय प्रतिष्ठापणाला लागली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेला जाहीर प्रचार रविवारी रात्री संपला. त्यानंतर मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी साडे सात वाजेपासून सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत अखंड मतदान होणार आहे. बुधवारी सकाळी मतमोजणी होणार आहे.
भाजपचे पाच गट बिनविरोध
निवडणुकीत शिरपूर तालुक्यातील चार आणि धुळे तालुक्यातील एक असे एकूण पाच गट बिनविरोध झाले आहे. तर गणात शिरपूर तालुक्यातील दोन आणि साक्री तालुक्यातील एक असे एकूण तीन गण बिनविरोध झाले आहेत. हे सर्व पाच गट आणि तीन गणावर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.
शिंदखेडा तालुका एकही
जागा बिनविरोध नाही
निवडणुकीत शिंदखेडा तालुक्यातूनही एकही जागा बिनविरोध झालेली नाही. तालुक्यातील सर्वच १० गट आणि २० गणात मंगळवारी मतदान होणार आहे. तालुक्यातील मेथी, वर्शी, नरडाणा, खलाणे गटात सर्वाधिक चुरस आहे. याठिकाणच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महाविकास आघाडी
जिल्ह्यात प्रथमच काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. मात्र शिरपूर तालुक्यात काही जागांवर आघाडी झालेली नाही. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होत आहे.
स्टार प्रचारकांमुळे चुरस
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपतर्फे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीतर्फे बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, धनंजय मुंडे, अमित देशमुख, दादा भुसे या मंत्र्यांनी जिल्ह्यात चारही तालुक्यात प्रचार सभा घेतल्याने प्रचारात रंगत आली होती. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यात निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडावे यासाठी तालुकानिहाय चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकूण ५१ गट आणि १०९ गणात होणाºया मतदानाच्या दिवशी एक पोलीस अधीक्षक, एक अप्पर पोलीस अधीक्षक, चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १५ पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक, ५४ पोलीस उपनिरीक्षक, १५०० पोलीस कर्मचारी, ८०० होमगार्ड आणि एसआरपी कंपनीचे एक प्लाटून पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज आहे. मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधींसोबत पोलीस बंदोबस्तही सोमवारी दुपारी रवाना झाला होता.