तीन आठवड्यांपासून पावसाची हुलकावणी आता प्रतिक्षा पोळ्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 05:13 PM2017-08-19T17:13:14+5:302017-08-19T17:22:38+5:30
धुळे जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपल्याने केवळ ३०-४० टक्केच उत्पादनाची शक्यता
आॅनलाईन लोकमत
धुळे,दि.१९ - जिल्ह्यात तब्बल तीन आठवड्यांपासून पावसाने खंड दिला असून खरीप पिके धोक्यात आली आहेत. ऐरवी गेलेला पाऊस पोळा सणावेळी हमखास परत येतो, अशी शेतकºयांची धारणा असल्याने पोळ्याची प्रतिक्षा केली जात आहे.
शनिवारी सकाळी धुळे शहरासह तालुक्यातील विंचूर, फागणे, न्याहळोद, बोरकुंड, धमाणे आदी परिसरात अवघा पाच-दहा मिनिटे केवळ रिमझिम पाऊस झाला. परंतु अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने या पावसाचाही पिकांना काडीमात्र उपयोग होणार नाही. तसेच अगदी जोरदार पाऊस बरसला तरी आता या टप्प्यात पिकांना त्याचा काहीही फायदा होणार नसल्याचे शेतकºयांनी सांगितले.
शिरपूर, शिंदखेडा तालुक्यांसह दोंडाईचा व पिंपळनेर परिसरात शनिवारी दिवसभर पावसाचे वातावरण होते. साक्री तालुक्यात पश्चिम आदिवासी पट्टा वगळता उर्वरीत भागात गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून पाऊस नाही. दिवसभर कडक ऊन पडते व वाराही वाहतो. आता पाऊस झाला तरी हाती केवळ ५० टक्के उत्पादन येईल, असे पावसाअभावी हवालदिल झालेल्या तेथील शेतकºयांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात बहुसंख्य भागात पिके वेळेवर पाऊस न झाल्याने कोमेजली व करपली असून नष्ट होत आहेत.