कचरा डेपोचे अखेर होणार स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:32 PM2019-03-19T22:32:44+5:302019-03-19T22:34:03+5:30
महापौरांचे आदेश : वरखेडीकरांना दिलासा
धुळे : शहरातील वरखेडी येथील कचरा डेपो अन्यत्र स्थलांतरित केला जाणार असून तसे आदेश मंगळवारी महापौर चंद्रकांत सोनार यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत दिले. त्यामुळे या डेपोमुळे नागरिकांची मोठ्या त्रासातून सुटका होणार आहे.
‘लोकमत’ने मंगळवारीच प्रसिध्द झालेल्या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन महापौर सोनार यांनी वरखेडी रस्त्यावरील कचरा डेपो बिलाडी रोडवरील सरकारी जागेवर स्थलांतर करण्याचा हा आदेश दिला.
महानगर पालिकेत सकाळी प्रथम महापौर सोनार यांच्या दालनात सकाळी ११ वाजता तातडीची बैठक बोलविण्यात आली.या बैठकीला स्वत: महापौर सोनार, उपायुक्त शांताराम गोसावी, बांधकाम अभियंता कैलास शिंदे, नगरसचिव मनोज वाघ, वरखेडी येथील नगरसेवक शत्रुघ्न भिल, संजय भिल, विजय जाधव, स्वच्छता विभागाचे लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते़
२०१७ पासून होती मागणी
वरखेडी कचरा डेपोतील प्रचंड कचरा व दुर्गधीला वरखेडीसह जुन्या धुळ्यातील नागरिकांना सतत सामोरे जावे लागत होते. यापूर्वी नगरसेवक असतांना २०१७ साली महापालिका प्रशासनाकडे हा कचरा डेपो स्थलांतर करण्याची मागणी मीच केली होती, असे महापौरांनी स्पष्ट केले. मात्र मनपाकडे पर्यायी जागा नसल्याने मार्ग निघाला नाही. नंतर मात्र हद्दवाढीतील ११ गावांच्या समावेशामुळे बिलाडी गावातील ३० एकर सरकारी जागेवर वरखेडी कचरा डेपो स्थलांतर करण्याची मागणी केली होती़ या डेपोच्या स्थलांतरामुळे नागरिकांचे सर्व प्रश्न सुटतील, असे बैठकीत सांगून महापौरांनी याबाबत आदेश दिले.
बिलाडी जागा विचाराधिन
राज्य विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु पर्यायी जागाच नसल्याने वरखेडीसह शहरातील नागरिकांना अक्षरश: नरकयातना भोगाव्या लागत होत्या.
शासनाकडून निधी उपलब्ध
हद्दवाढीतील गावांमध्ये कचरा डेपोसाठी पर्यायी जागा मिळाल्याने प्रश्न धसास लागला आहे. घनकचरा संकलन व्यवस्थापनासाठी १८ कोटींचा ठेका नाशिक येथील खाजगी कंपनीस देण्यात आला असून घनकचरा व्यवस्थापनासाठी २५ कोटी रूपयांचा आराखडाही तयार झाला आहे़ कचरा संकलनासोबत त्यावर प्रकिया होण्यासाठी बायोमायनिंग व इतर कामांसाठी शासनाकडून ४ कोटी रूपये मंजूर झालेले आहेत़ लवकरच कचरा डेपोचे स्थलांतर मार्गी लागणार असल्याचे उपायुक्त शांताराम गोसावी यांनी सांगितले़
डेपोच्या आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात
कचरा डेपोला आग लागल्याने अनेक शहरामध्ये दुर्घटना होऊन लाखो रूपयांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ मात्र वरखेडी कचरा डेपोला बाराही महिने आग लागते़ स्थानिक शेतकऱ्यांचा चारा, शेती पिकाचे नुकसान होत़ अधिकाऱ्यांकडून आगीचे कारण एकच सांगितले जाते गॅस तयार होऊन आग लागते़ मात्र ७६ टक्के स्थानिक नागरिक म्हणतात की, कचरा कमी होण्यासाठी डेपोला आग लावली जाते़ व धुराचा त्रास सहन करावा लागतो़ त्यामुळे आगीचे कारण अधिकाऱ्यांच्या गुलदस्त्यात असल्याचे दिसुन येत आहे़