पाणी आले; पण थकीत बिलामुळे वीज गेली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2017 10:42 PM2017-01-04T22:42:53+5:302017-01-04T22:42:53+5:30
एकीकडे पाणी आले, तर दुसरीकडे वीज गुल झाली, असा प्रकार बुधवारी मनपात घडला.
धुळे : मनपाने ४३ लाखांचा धनादेश दिल्यानंतर अखेर बुधवारी सायंकाळी पाणीपट्टी न भरल्याने पाटबंधारे विभागाने खंडित केलेला नकाणे तलावाचा पाणीपुरवठा सुरळीत झाला़ पण दुसरीकडे थकीत बिलापोटी मनपाच्या चार सार्वजनिक शौचालयांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला. एकीकडे पाणी आले, तर दुसरीकडे वीज गुल झाली, असा प्रकार बुधवारी मनपात घडला.
अखेर पाणीपुरवठा सुरळीत
मनपात सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत प्रयत्न सुरू होते़ आयुक्त मनपात उपस्थित नसल्याने सभागृह नेते कमलेश देवरे यांनी अन्य अधिकाºयांशी चर्चा करून पाटबंधारे विभागात जाऊन अधिकाºयांशी चर्चा केली़ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के़टी़सूर्यवंशी यांच्या आदेशाने कारवाई झालेली असून ते रजेवर असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नव्हता, त्यामुळे पाटबंधारे विभाग पाणीपुरवठा पूर्ववत करण्यास तयार नव्हता़ मात्र सूर्यवंशी यांच्याशी संपर्क झाल्यानंतर अखेर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश त्यांनी दिले़ त्यानंतर सायंकाळी नकाणे तलावाचे गेट उघडून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला़ या वेळी सहायक कार्यकारी अभियंता नागेश वट्टे, उपअभियंता बेहेरे, मनपा उपायुक्त रवींद्र जाधव, शहर अभियंता कैलास शिंदे, चंद्रकांत उगले उपस्थित होते़ एकूण ३ कोटी ७ लाखांच्या पाणीपट्टीपैकी ७५ लाख ७३ हजार चालू पाणीपट्टी आकारणी होती़ त्यापैकी ४३ लाख ४ हजार ८६ रुपयांचा धनादेश पाटबंधारे विभागाला देण्यात आल्याची माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाने दिली़ महापौर कल्पना महाले यांनीदेखील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले़ शहरातील ४० टक्के भागाला नकाणे तलावातून पाणीपुरवठा होतो़ मात्र पाटबंधारे विभागाने केलेल्या कारवाईमुळे नकाणे तलावातून पाणीपुरवठा होणाºया भागाला बुधवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही़ याबाबत ‘लोकमत’ने संबंधित भागातील नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या असता नागरिकांनी मनपाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली़
वीजपुरवठा झाला खंडित
मनपा सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट असतानाच चार सार्वजनिक शौचालयांचे वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीकडून चारही सार्वजनिक शौचालयांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला़ वडजाई रोडवरील २, मोगलाई परिसरातील १ व हमाल-मापाडी परिसरातील १ अशा चार सार्वजनिक शौचालयांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला़ वीज बिलापोटी जवळपास ४० ते ५० हजार रुपयांचे चालू वीज बिल थकल्याची माहिती महावितरणच्या अधिकाºयांनी दिली़ त्यामुळे आता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील़ शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका दिलेल्या ठेकेदारांची बिले मनपाने अदा केलेली नाही़