ब्रिटिशकालीन पाटचारीत ‘पाणी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:43 AM2017-08-07T00:43:37+5:302017-08-07T00:46:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बेटावद : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे असलेल्या ब्रिटिशकालीन पाटचारीची तरुणांनी दुरुस्ती केली़ परिणामी या पाटचारीत पांझरेचे पाणी आल्याने त्याचा परिणाम जलसंवर्धनात होणार आहे़ बेटावद गावातील तरुणांच्या श्रमदानामुळे हे शक्य झाले असल्याचे चित्र समोर आलेले आहे़ त्यांचे हे कार्य आदर्श मानले जात आहे़
शिंदखेडा तालुक्यातील बेटावदला असलेली पांझरा नदी जलसंजीवनी असल्यामुळे काठावरील गावांना पांझरा नदीच्या पाण्याचा लाभ चांगल्यापैकी मिळतो आहे़ परंतु बेटावदला तो एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मिळण्यासाठी ब्रिटिशांनी करून ठेवलेली ‘कल्पकता’ आजही उपयुक्त ठरत आहे़ बेटावद मंडळातील अजंदे बुद्रूक येथील के़ टी़ वेअरच्या बाजूला ब्रिटिशांनी एक पॉर्इंट दिलेला होता़ तेथून त्या पॉर्इंटवरून पांझरा नदीचे पाणी त्या ठिकाणी आल्यावर तेथून एक पाटचारी ब्रिटिशांनी तयार करून दिलेली होती़ त्यात ते पाणी टाकून त्याचा लाभ बेटावदसह पडावद, पाष्टेच्या शिवारापर्यंत शेतीस मिळण्यास मदत होत आहे़ या ब्रिटिशकालीन पाटचारीचा आधार घेऊन तिच्या काठावर असलेल्या विहिरींच्या जलपुनर्भरणाचा प्रयोगही झालेला आहे़ यामुळे बेटावद येथील ब्रिटिशकालीन पाटचारीला ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे़
असे असताना दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर दुरुस्ती होणे आवश्यक असते़
गेल्या वर्षभरापूर्वी या पाटचारीमध्ये निर्माण झालेल्या असंख्य अडथळ्यांमुळे या पाटचारीमध्ये पाणी पूर्ण क्षमतेने वाहत नव्हते़ त्यासाठी येथील दिनेश नारायण माळी, आऱयू़ पाटील, योगेश बाविस्कर, प्रमोद माळी, मेघराज माळी, महेंद्र कैलास माळी, रवींद्र फुले, वसीम बागवान या तरुणांनी स्वखर्चाने आणि श्रमदान करून या ब्रिटिशकालीन पाटचारीमधील संपूर्ण अडथळे दूर केले़
या पाटचारीची साफसफाई केली़ त्यामुळे ही पाटचारी त्यांनी केलेल्या श्रमदानामुळे तुडुंब भरून वाहत आहे़ सध्या हा लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे़