जलयुद्ध टाळण्यासाठी जलसंवर्धनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:50 AM2019-03-26T11:50:15+5:302019-03-26T11:51:00+5:30
जलसाक्षरता अभियान : महाराणा प्रताप विद्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. अरगडे यांचे प्रतिपादन
आॅनलाइन लोकमत
धुळे : पाणी या नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. सध्या अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्याने, दुष्काळाचा सामना करावा लागतोय. काळाची पाऊले ओळखून जलयुद्ध टाळण्यासाठी प्रत्येकाने जलसंवर्धन करावे असे प्रतिपादन डॉ. किशोर अरगडे यांनी येथे केले.
महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना विभाग मार्फत आयोजित जलसाक्षरता अभियान अंतर्गत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. अरगडे बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र पाटील होते.
डॉ. अरगडे म्हणाले, जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. कारण तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यासाठी होईल असे शास्त्रज्ञांनी भाकीत केले आहे. हे जलयुद्ध टाळण्यासाठी आपल्याला पाणी बचतीशिवाय तरणोपाय नाही. जल हेच जीवन आहे. पाणी बचतीतूनच देश समृद्ध होऊ शकतो. म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत. त्याचप्रमाणे विविध कृतीतून, उपक्रमातून पाण्याची कशी बचत करता येईल याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सोनाली सिसोदिया यांनी विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा दिली. अनिता राजपूत, संगीता कुवर, मीनल राठोड, रविंद्र राजपूत, भारती पाटील, हितेंद्र परमार, गजेंद्र पावरा, निलेश राजपूत आदी शिक्षक उपस्थित होते. इंद्रजित जमादार यांनी आभार मानले.