जिल्ह्यातील १२३५ अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:49 AM2021-02-26T04:49:53+5:302021-02-26T04:49:53+5:30
लोकसंख्येच्या आधारावर अंगणवाड्यांची निर्मिती करण्यात येत असते. धुळे जिल्ह्यात नियमित १९१३ व मिनी १९१ अशा एकूण २१०४ अंगणवाड्या आहेत. ...
लोकसंख्येच्या आधारावर अंगणवाड्यांची निर्मिती करण्यात येत असते. धुळे जिल्ह्यात नियमित १९१३ व मिनी १९१ अशा एकूण २१०४ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमधून ३ ते ६ वर्षे वयोगटातील ९१ हजार ४३८ विद्यार्थी शिक्षण घेत असतात. तर शुन्य ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार दिला जातो.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेल्या वर्षापासून अंगणवाड्या सुरू झालेल्या नाहीत. सध्या अंगणवाड्यांमध्ये फक्त बालकांचे वजनमाप घेणे, आरोग्य तपासणी करणे हीच कामे केली जातात. बालकांना आहार देतांनाही अंगणवाड्यांमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जात असते.
दरम्यान अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या बालकांसाठी पाण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत सर्वसाधारण क्षेत्रातील १६६ व आदिवासी क्षेत्रातील १६४ अशा ३३० अंगणवाड्यांमध्येच नळ जोडणी असल्याने, तेथे बालकांची पाण्याची व्यवस्था आहे. मात्र उर्वरित अंगणवाड्या पाण्याच्या बाबतीत परावलंबी असल्याचे दिसून येत आहे. ज्या अंगणवाडीत पाण्याची सुविधा नाही, अशा ठिकाणी जवळच असलेल्या विहीर, हातपंपावरून पाणी आणून ते हंडा अथवा माठात भरून ठेवावे लागते. पाणी संपल्यावर पुन्हा ते भरावे लागते. अशा अंगणवाड्यांची संख्या थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १२३५ एवढी आहे.
नळजोडणी नसलेल्या अंगणवाड्यांमध्ये सर्वात जास्त संख्या साक्री तालुक्यात ४४२ एवढी आहे. त्याखालोखाल धुळे तालुक्यातील ३६७, शिरपूर तालुक्यातील ३२२ व शिंदखेडा तालुक्यातील १०४ अंगणवाड्यांमध्ये नळजोडणी नाही. त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट आहे. दरम्यान आता जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक अंगणवाडीला नळजोडणी देण्यात येत आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत ५३९ अंगणवाड्यांना नळजोडणी देण्यात आलेली आहे. तसेच ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतूनही अंगणवाड्यांमध्ये नळ जोडणी देण्याचे आदेश आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील उर्वरित अंगणवाड्यांमध्येही नळजोडणी करून पाण्याची व्यवस्था होणार आहे.