धुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 05:00 PM2018-02-14T17:00:06+5:302018-02-14T17:01:07+5:30
पाटबंधारे विभाग : एका दिवसात ३५ दशलक्ष घनफूट नदीपात्रात; पांझरा काठच्या गावांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून साक्री तालुक्यात असलेल्या अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून बुधवारी दुपारी १ वाजता पाटबंधारे विभागातर्फे पाणी सोडण्यात आले आहे. प्रतिसेकंद ३५० क्युसेस या वेगाने एका दिवसात ३५ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी यांनी दिली. अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धुळे, शिंदखेडा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पाणी टंचाईची झळ धुळे व शिंदखेडा तालुक्यातील गावांना सहन करावी लागत आहे. त्यात गेल्यावर्षी परतीचा दमदार पाऊस झाल्यामुळे अक्कलपाडा धरणात समाधानकारक जलसाठा होता. त्यामुळे या धरणातून पाणी कधी सुटणार? याकडे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागून होते.
जिल्हाधिकाºयांनी दिले होते
पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला आदेश
अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी यांना सोमवारीच आदेश दिले होते. त्यात म्हटले होते, की धुळे व शिंदखेडा तालुक्यातील पांझरा नदीकाठावरील गावांना टंचाईची परिस्थितीची पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदी पात्रात पाणी सोडणे आवश्यक आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मौजे मुळी प्र. डांगरी व निमकपिलेश्वर गावापर्यंत जाणवणाºया टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्याची मागणी करण्यात आल्यामुळे पाटबंधारे विभागाने कार्यवाही करावी, असे पत्रात नमूद केले होते.
तीन दिवसात धुळ्यात येणार पाणी
अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याप्रसंगी बुधवारी दुपारी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. ओ. पवार, शाखा अभियंता बी. व्ही. जिरे, जे. डी. खैरनार, भाजपा नेते रामकृष्ण खलाणे, न्याहळोदच्या सरपंच ज्योती भिल, गटनेते विकास पवार, उपसरपंच प्रताप माळी, नेरचे सरपंच शंकर खलाणे, कैलास रोकडे व ज्ञानेश्वर रोकडे आदी उपस्थित होते. अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुढील तीन दिवसात धुळ्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
९ क्रमांकाच्या दरवाजातून सुटले पाणी
अक्कलपाडा धरणाला एकूण १७ दरवाजे आहेत. एकूण दरवाजांपैकी ९ व्या क्रमांकाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी पुढील १२ दिवसात पांझरा नदीच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या मुडावद या गावापर्यंत पोहचणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली आहे.