पाणीपट्टीची रक्कम टंचाईच्या निधीतून द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:02 PM2019-03-30T12:02:54+5:302019-03-30T12:03:51+5:30
जि.प. सर्वसाधारण सभा : पाईपलाइन टाकण्याच्या कामास आचारसंहितेचा अडसर
आॅनलाइन लोकमत
धुळे : अक्कलपाडा धरणातून पांझरानदीत आवर्तन सोडण्यात येते. मात्र हे आवर्तन सोडण्यासाठी सिंचन विभागातर्फे पाणीपट्टी रक्कमेची मागणी केली जात आहे. सध्या दुष्काळ असल्याने, पाण्याची समस्या लक्षात घेऊन, पाणीपट्टीची रक्कम टंचाईच्या निधीतून देण्यात यावी असा ठराव करण्यात आला.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती लिलावती शिक्षण सभापती नूतन पाटील, समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे उपस्थित होते.
सध्या लोकसभेची आचारसंहिता सुरू असल्याने कुठल्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने, सर्वसाधारण सभेत फक्त आयत्यावेळच्या दोन विषयांवर चर्चा करण्यात आली.
शिंदखेडा तालुक्यातील रामी येथे तीव्र पाण्याची टंचाई आहे. या गावासाठी तापीनदीवरून पाईपलाइन मंजूर झाली असून, त्याची वर्क आॅर्डरही निघालेली आहे. या परिसरात बागायती शेती असल्याने, त्यावेळी पाईपलाइन टाकता आली नाही. आता शेती मोकळी झालेली आहे. परंतु आता आचारसंहितेचे कारण पुढे करीत काम बंद ठेवलेले आहे. अधिकारी लाइनआऊटही करून देत नाही. याबाबत जि.प. सदस्य कामराज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर अधिकाऱ्यांनी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. तर लेखी आदेश नसल्याने, तोपर्यंत काम थांबविता येणार नाही अशी सूचना अध्यक्ष दहिते यांनी केली.
त्यानंतर अक्कलपाडा धरणातून सोडण्यात येणाºया आवर्तनाविषयी जि.प. सदस्य किरण पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. अक्कलपाडा धरणातून पांझरानदीत आवर्तन सोडले जाते. मात्र त्यासाठी पांझरा नदीकाठावरील गावांनी पाणीपट्टीची रक्कम भरावी असा आग्रह सिंचन विभागातर्फे धरण्यात येतो आहे. पांझरा किनारी असलेल्या ग्रामपंचायतींकडे सुमारे ५ कोटीची थकबाकी आहे. सध्या पाण्याची टंचाई लक्षात घेता पाणीपट्टीची रक्कम टंचाईच्या निधीतून भरण्यात यावी असा ठराव मंजूर करण्यात आला.