शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू, दत्ताणे-मेलाणे गावाला टॅँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 06:48 PM2018-02-26T18:48:57+5:302018-02-26T18:48:57+5:30
धुळे जिल्हा : नऊ गावांना टॅँकरने पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा प्रशासनाने शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू व दत्ताणे-मेलाणे या गावातील भीषण पाणी टंचाई विचारात घेता या गावांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू केला असून जिल्ह्यात सद्य:स्थितीत नऊ गावांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टॅँकरने पाणी पुरवठा सुरू असणाºया गावांपैकी शिंदखेडा तालुक्यातील आठ गावे असून एक गाव धुळे तालुक्यातील आहे.
यंदा जिल्ह्यात धुळे व शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी, या दोन्ही तालुक्यातील बहुसंख्य गावांची आणेवारी ही ५० पैशाच्या आत आहे. परिणामी, या दोन्ही तालुक्यातील काही गावांना पाणी टंचाईची झळ बसली आहे. जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात आठ गावांना टॅँकरने पाणी पुरवठा सुरू होता. त्यानंतर शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू व दत्ताणे-मेलाणे गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये प्रशासनातर्फे टॅँकरने पाणी दिले जात आहे. दरम्यान, शिंदखेडा तालुक्यातील वारूड गावात सद्य:स्थितीत पाण्याची परिस्थिती बरी असल्याने जानेवारीच्या अखेरीस वारूड गावात सोडण्यात येणारे पाण्याचे टॅँकर बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सद्य:स्थितीत या गावांना टॅँकरने पाणी पुरवठा
शिंदखेडा तालुका : पथारे, भडणे, वरूळ, चुडाणे, वाघाडी, विटाई, सोनशेलू, दत्ताणे-मेलाणे, धुळे तालुका : आंबोडे