पाण्यासाठी आबाल, वृद्धांची वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:38 PM2019-02-17T22:38:27+5:302019-02-17T22:39:16+5:30
न्याहळोद : जलयुक्तची कामे अपूर्ण झाल्याने अत्यल्प फायदा, अक्कलपाड्याच्या आवर्तनाकडे लक्ष
विजय माळी।
लोकमत न्यूज नेटवर्क
न्याहळोद : यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी स्थिती आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्याने नळाजवळ भांडी ठेऊन ग्रामस्थांना ताटकळत उभे रहावे लागत आहेत. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी उपाय योजना केल्या तरी पांझरेच्या आवर्तनावरच पुढील उन्हाळा अवलंबून राहणार आहे.
सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात घरोघरी नळ जोडण्या आहेत. पांझरा नदीकाठी असलेल्या गाव विहिरीतून पाण्याची टाकी भरली जाते. मात्र, येथूनच परिसरातील सात गावांच्या पाणी पुरवठा विहिरी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्याने मूळ गावातच पाणीटंचाई निर्माण होते.
टंचाईवर मात करण्यासाठी युवकांनी श्रमदानातून जुनी पाण्याची टाकी व विहीर दुरुस्ती केली. याचा फायदा झाला; परंतू पाण्याची पातळी खोल गेल्याने पुन्हा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.
जलयुक्तची कामे झाली. परंतू गावाची लोकसंख्या व शेत शिवाराचे क्षेत्रफळ पाहता अत्यंत कमी काम झाल्याचे दिसून येत आहे. कामे सर्वत्र झाली तरच जलयुक्त शिवार कामांचा उपयोग होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरुन पाटबंधारे विभागातर्फे बुधवारी अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी गावाजवळ पोहचल्या नंतर काही दिवसांनी विहिरींची जल पातळी वाढणार आहे. त्यामुळे सर्वांचे या पाण्याच्या आवर्तनाकडे लक्ष लागून आहे. पाणी जूनपर्यंत हवे, अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याने तब्बल आठ महिने नदी पात्र कोरडे आहे. त्यामुळे गावात प्रथमच पाण्याचे टँकर, बोअरींग करणे, खाजगी शेतकºयाच्या विहिरीचे पाणी घेणे अशा पर्यायी उपाययोजना कराव्या लागल्या. पाणी भरण्यावरून अनेकवेळा वाद देखील झाले. आता आवर्तनाचे पाणी कधी पोहचते, त्यावरच पाणीटंचाई दूर होणे अवलंबून राहणार आहे.
पाणी पुरवठा विहिरीतील गळ काढणे, आडवे बोअर करणे यासह जुनी पाणी वितरण व्यवस्थेची गळती बंद केली. शासकीय मदत अजून घेतली नाही.
-ज्योती भिल, सरपंच न्याहळोद