आम्ही तळीरामपेठी!
By admin | Published: May 8, 2017 04:38 PM2017-05-08T16:38:57+5:302017-05-08T16:38:57+5:30
‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशल या सदरात थोडं वेगळ या विषयावर दुष्यंत जोशी यांनी केलेले लिखाण
Next
>उद्या ना आम्ही मंत्रालयावर मोर्चाच काढणार आहोत. ऐकलं का? ओ भो? धमकी नाहीये. खरच मोर्चा काढूृन त्या मंत्र्यांना खडसावून जाब विचारणार, ‘‘का हो? आमच्याच मागे का लागलात?’’ ‘‘आम्ही काय कुणाची पितो रे, तो साकी आम्हाला देतो रे!’’ आता हा साकी कोण म्हणून काय विचारता?... जाऊ द्या, तुम्हाला नाही कळणार, तुम्हाला एक कविता ऐकवू? नाही हो, काही तरीच काय म्हणताय की, चक्क न पिता आम्ही काही करूच शकत नाही म्हणून? तुम्ही ना, फारच अरसिक आहात! हं तर ऐका माझी कविता - ‘‘उंच लोक उंची पसंद, उंच रस्त्यावर कुठे नाहीच र्निबध!’’ झाली कविता. कशी वाटली? दुसरी ऐकवं म्हणताय? ऐका ‘‘टेबलावर ठेवलीय भरलेली ताटली, एकाच घोटात संपवतो अख्खी उभी बाटली’’ वाह वाह! हिंदीतून ऐकवू? नको म्हणता? राहू दे, नको तर राहिलं! जोशी काकाचं ऐकवतील हिंदीतून भाषांतर करून मग तर झालं! .. हे अस्सं होतं आमचं. घेतल्या बिगर अक्कल चालत नाही अन् जास्त झाली की ‘स्व’ चा विसर पडतो. तर काय म्हणत होतो मी? आमच्याच मागे का लागला आहात सरकार तुम्ही? गावात त्रास होतो म्हणून आधी बाहेर हाकललंत आम्हाला! आता उंच रस्त्यावरून.. (हायवे की काय म्हणतात ना तेच ते).. हाकलल्यावर कुठं बर जायचं आम्ही ‘बापडय़ांनी’? घरात ‘घ्यायची’ म्हटली तर साता जन्माची वैरीण.. म्हणजे ‘बायको’ हो बडव बडव बडवते.. हल्ली तर पोरं अन् पोरीसुद्धा ‘रणरागिणी’ होतात अन् धू धू धुतात हो मला, धोनी जसा समोरच्या टीमला धुतो ना, अगदी तस्सचं. मग आमचे सहानुभूतीदारपण जखमेवर मीठ चोळल्यासारखं वर तोंड करून विचारतात, ‘‘क्या हालत बना रख्खी है जनाब, कुछ लेते क्यूँ नही?’’ काय उत्तर देणार? कप्पाळ? फालतू माणसंही म्हणजे - स्वत:ला शुद्ध निव्र्यसनी म्हणवून घेणारी मंडळीदेखील आम्हाला सारखे टोमणे हाणतात हो - ‘‘काल रात्री कस्सा लेझीम खेळत चालला होता’’ अशा कॉमेंटस् ऐकल्याना की हृदय कसं विदीर्ण होऊन जातं हो - मन भरून येतं अनं गाऊ लागतं - ‘‘द्या कुणी आणून द्या, प्याला विषाचा’’ पण हे ऐकणारीही मठ्ठच! पटकन बाटली अन् प्याला आणून देते अन् तिरस्काराने म्हणते ढोसा एकदाची! अन् राहा पडून मुकाटय़ानं! आता तुम्हीच सांगा ‘सोप्पी व्हिस्कीटेड’ माणसं (उच्चारण चुकलं वाटतं) नाही, सोफिस्टिकेटेड माणसं घेतात तेव्हा ती फॅशन, आणि आम्ही सामान्यांनी घेतली तर ते व्यसन? त्यांनी स्टार हॉटेलमध्ये घेतली तर कंपनी आणि आम्ही ‘सरकारी’त घेतली तर ‘पिय्यकड’? हा बरा न्याय आहे! असो ..
हमारे धंदे में सभी इनामदार (पुन्हा चुकीचा उच्चार) नही इमानदार होते है! कुणालाही सायंकाळी - रात्री भेटा खरचं बोलतील. खोट्टं? अं हं कध्धीच नाही बोलणार! या की एकदा आमच्या मधुशालेत गुपचुप. पण एका अटीवर बरं का - इकडे तिकडे पाहायचं नाही. मुकाटय़ाने आस्वाद घेत घेत एन्जॉय करायचा. नाहीतर अरे आपले ते हे.. तो हा.. ती ही.. नो नाय नेव्हर! कुछ बोलने का नही! तुम्हाला कुणीही पाहिलं तरी चालेल. पण तुम्हाला कुणी ओळखीचं दिसलं तरी तुम्ही फार मनाला लावून घ्यायचं नाही. इथे आल्यावर सगळे कसे शत प्रतिशत शुद्ध! (असं त्यांचं म्हणणं बर कां?) तर.. तर्र्र झाल्यावर आम्ही ठरवलं.. आता गत्यंतर नाही.. मोर्चाचं काढायचा मंत्रालयावर! सोबत आमच्या आहेत ना अनेक थोर सामाजिक कार्यकर्ते (आमचे सदस्य.. शू हळू बोला) अहो तळागाळातल्यांसाठी काम करतो ना आम्ही, तळीराम, तेव्हा ठेवावे लागतात असे काही ‘प्रतिष्ठित’. या तर मग भेटू या आज सायंकाळी आपल्या कार्यालयात उद्याच्या उज्जवल (?) भवितव्यासाठी! वेलकम स्वागत आहे, आपलं तळीरामपेठेतल्या अंडरग्राऊंड हापीसात! जय मधुशाला!