'विकासाचे जे काम करतो त्याचेच श्रेय घेतो ! ; आमदार डाॅ. फारुख शाह यांचा विरोधकांना टोला
By देवेंद्र पाठक | Published: March 13, 2023 07:16 PM2023-03-13T19:16:47+5:302023-03-13T19:17:38+5:30
शहरात जी काही विकासाची कामे केलेली आहेत, त्याचेच श्रेय मी घेतो.
धुळे- शहरात जी काही विकासाची कामे केलेली आहेत, त्याचेच श्रेय मी घेतो. अन्य कोणत्याही दुसऱ्याने केलेल्या कामांचे श्रेय घेत नाही असा टोला आमदार डाॅ. फारुख शाह यांनी काँक्रिटीकरणाच्या शुभारंभप्रसंगी विरोधकांना लगावला.
शहरातील अनेक नवीन कॉलन्यांमध्ये गटारी व रस्त्याची सोय नसल्यामुळे आमदार डाॅ. फारुख शाह यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक १९ मधील बोरसे कॉलनी गुलशनाबाद २ हजार वस्ती शब्बीर नगर येथे काँक्रीट गटार करणे या कामाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी आमदार डाॅ. शाह बोलत होते.
आमदार यांनी विरोधकांचा यावेळी चांगलाच समाचार घेतला. कोणत्याही कामाचे श्रेय घेण्यापेक्षा जी कामे आपण केली आहेत त्याचेच श्रेय घ्यायला हवे. जी कामे माझ्या विकास निधीतून केली त्याचे श्रेय मी घेतो, त्याचे बॅनर लावतो. जे मी केले नाही त्याचे श्रेय मी कशाला घेऊ असेही आमदार म्हणाले.
या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी मनपाचे नासिर पठाण, नगरसेवक आमिर पठाण, प्यारेलाल पिंजारी, इब्राहिम ठेकेदार, नाजीम शेख, आसिफ शाह, शोएब मुल्ला, फकिरा बागवान, चिंटू हाजी अजिज शेख, डॉ. शकील शेख, आमिर सय्यद, जाकिर शेख, अझर खान, मुंशी शेख, मझहर मंसुरी, दानीश शेख, वासिम सैय्यद, परवेज शेख, सत्तार शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून पावसाळ्यात पावसाचे पाणी तुंबत होते आणि हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. तेथे नवीन काँक्रीट गटार व्हावी अशी परिसरातील रहिवासी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती. याठिकाणी गटार नसल्याने आणि पाणी साचत असल्याने रस्त्याची खूपच दुर्दशा झालेली होती. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्या रोडवरून जाताना लहान-मोठे खड्डे व साचलेले पाणी यातून वाहने घेऊन जाणे यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.
या ठिकाणी मागील काही आठवड्यांपूर्वी आमदार फारुख शाह यांना तेथील नागरिकांनी तक्रार व मागणीचे निवेदन दिले होते. यावरून आमदार फारुख शाह यांच्या आदेशावरून त्या भागातील रस्ते व गटारीसाठी आमदार कार्यालयामार्फत पाहणी करण्यात आली होती.