धुळे ग्रंथोत्सवात चिमुकल्यांच्या कलाविष्काराला रसिकांची दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 05:29 PM2018-01-23T17:29:09+5:302018-01-23T17:30:03+5:30
सांस्कृतिक : नाटीका, भारूड, गीत गायनाने जिंकली मने; उद्या होणार समारोप
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जि.प.च्या राष्टÑीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत आयोजित ‘धुळे ग्रंथोत्सव २०१७-२०१८’ निमित्ताने मंगळवारी सकाळी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक सुरेख कलाविष्कार सादर करीत येथे उपस्थित रसिकांची दाद मिळविली. उत्तरोउत्तर रंगलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी नाटीका, भारूड, देशभक्तीपर गीत गायन करीत सभागृहात उपस्थित रसिकांची मनेही जिंकली. दरम्यान, धुळे ग्रंथोत्सवाचा बुधवारी समारोप होणार आहे.
शहरातील कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेतील डॉ. जगन्नाथ वाणी सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी उपमुख्याध्यापिका मनीषा जोशी, शिक्षण विस्तार अधिकारी रंजिता ढिवरे, अहिराणी साहित्यिक तथा पाचव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष अहिरे, प्रा. सदाशिव सूर्यवंशी, स्मीता उपासणी, अश्विनी ठाकूर आदी उपस्थित होते.
स्वागत गीताने आणली रंगत
मंगळवारी सकाळी ग्रंथोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांनी सुरुवात झाली. त्यानंतर कमलाबाई शंकर कन्या प्राथमिक विद्यालयातील विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘स्वागत गीत’ व ‘जिंगल बेल जिंगल बेल आॅल द वेल’ या गीतावर थिरकून कार्यक्रमात रंगत आणली. या गीतात सहभागी विद्यार्थिनींनी सांताक्लॉजचा पोशाख परीधान करीत सदाबहार गीतावर ठुमके दिले.
कथाकथनातून प्रबोधन
कमलाबाई कन्या शाळेतील इयत्ता आठवी ते अकरावीच्या विद्यार्थिनींचा कथाकथनाचा कार्यक्रम झाला. यात सहभागी विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या कथा मांडून त्याद्वारे स्त्री भ्रूणहत्त्या रोखावी, पाणी वाचवा, महिला सक्षमीकरण या विषयांवर प्रबोधन केले. यानंतर इस्लाहूल बनात उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ‘मेरा मुल्क, मेरा देश, मेरा है वतन’ हे देशभक्तीपर गीत सादर केले. यानंतर फागणे येथील छगनमल बाफना हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारूड सादर केले.
अनुकरूणातून नव्हे; तर कृतीतून अभिनय जन्माला येतो...
कोणतेही मुल हे जन्मताच नाट्यरंग घेऊन जन्माला येत असते. लहान मुले भातुलकीचा खेळ खेळतात. तेव्हा ते एक प्रकारे नाटकच असते. परंतु, पालक, शिक्षक याकडे दुर्लक्ष करतात.
लहान मुलांच्या प्रत्येक कृतीत नाट्य असते. मात्र, त्यांच्यातील या कलागुणांचा लहानपणी विकास होत नाही, अशी खंत व्यक्त करत अभिनय हा अनुकरणातून नव्हे; तर प्रत्यक्ष कृतीतून जन्माला येत असतो, असे ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक व कवी सुभाष अहिरे यांनी येथे सांगितले. धुळे ग्रंथोत्सवात सकाळच्या सत्रात ज्येष्ठ आहिराणी साहित्यिक व कवी अहिरे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. प्रा. सदाशिव सूर्यवंशी यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी म्हटले, की अभिनयातून साकार व्हायचे असेल तर मनात कुणीही संकोच ठेवता कामा नये.
लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. हे विधान सत्य आहे. परंतु, त्यांच्या कलागुणांचा विकास लहानपणी होत नाही. अनेकदा तर पालकच त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतात. विद्यार्थ्यांना पालकांनी मोकळीक दिली पाहिजे.
शाळेतही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांकडे लक्ष दिले पाहिजे; असे त्यांनी येथे नमूद केले.
सहचारिणीच्या अंगात कवीता संचारते तेव्हा....
जीवन प्रवासात सहचारिणीच्या योगदानाबाबत काय सांगाल? याविषयी सुभाष अहिरे म्हणाले, की अहिराणी साहित्यिक क्षेत्रातील प्रवासात माझ्या सहचारिणीचे योगदान हे मोठे आहे. तिच्यामुळे मला प्रत्येक टप्प्याट प्रोत्साहन मिळत गेले. परंतु, तिच्या अंगात जेव्हा कवीता संचारते तेव्हा माझ्या जवळ असलेले कवी, साहित्यिक हे अक्षरश: पळत सुटतात, असे सांगताच सभागृहात एकच हंशा पसरला. पुढे अहिरे यांनी अहिराणी भाषेतून रामायण लिहण्यामागची भूमिकाही येथे स्पष्ट केली.
विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील जिज्ञासा जागृत करावी
साहित्य क्षेत्राकडे मुलांनी कसे वळले पाहिजे? याविषयी बोलताना सुभाष अहिरे यांनी सांगितले, की हल्लीच्या पिढीतील मुले परीक्षेत पास होण्यापुरता पाठ्यपुस्तके वाचतात. परंतु, विद्यार्थ्यांनी हा दृष्टीकोन ठेऊ नये. ज्ञानाची कक्षा वृद्धिंगत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सभोवतालचे निरीक्षण, अवांतर वाचन केले पाहिजे. त्यांच्यातील जिज्ञासा विद्यार्थ्यांनी जागृत ठेवावी, असे आवाहन केले.
अन् पहिली कविता कागदावर उतरविली...
अहिराणी, साहित्य व कवीता या क्षेत्राकडे कसे वळलात? यावर बोलताना सुभाष अहिरे म्हणाले, की आमच्या घराण्यात ग्रंथ, पुराण या प्रकारचा एकही वारसा नव्हता. लहानपणाच्या काळात बारा बलुतेदार ही व्यवस्था होती.
माणूस जात बंधनात अडकलेला होता. ही विषमता पाहून सर्वात प्रथम कागदावर कविता लिहिली. त्यानंतर मात्र, माझे कवीता व अहिराणी भाषेतील साहित्य हे घडतच गेले.
माझ्यातील साहित्यिक घडविण्यात आईचा वाटाही मोठा आहे. आई म्हणजे माझे विद्यापीठच होते. तिने जात्यावर दळता-दळता मला मांडीवर घऊन ज्या ओवी गायल्या. त्यातूनच कवीता रचण्याची आवड निर्माण होत गेल्याचे त्यांनी येथे सांगितले.
विद्यार्थ्यांना कवी, लेखक, साहित्यिक व्हायचे असेल, तर त्यांनी मनन, चिंतन व अवांतर वाचन केले पाहिजे, असे आवाहन अहिराणी साहित्यिक अहिरे यांनी येथे केले.