उपनिरीक्षक झालेल्या कन्येचे गावातर्फे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:32 AM2019-03-10T11:32:32+5:302019-03-10T11:33:17+5:30
महिला दिनाचे औचित्य : शिंदखेडा तालुक्यातील अलाणेकरांचा प्रेरणादायी उपक्रम
शिंदखेडा : तालुक्यातील अलाने येथील सर्वसामान्य कुटुंबातील मोनिया कोमलसिंग गिरासे ही तरुणी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अलाने ग्रामस्थांकडून गावाच्या वेशीवर जाऊन तिची सजविलेल्या घोड्यावर बसवून व ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. तसेच घरोघरी औक्षण करून जंगी स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी गावातील महिला व पुरुषांसह पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. अलाणे या छोट्याशा खेडेगावात अभ्यासाला पोषक वातावरण नसतानाही केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मोनिया कोमलसिंग गिरासे या तरुणीने पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. तिचे प्राथमिक शिक्षण अलाने गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण चिरणे येथील यशवंत विद्यालयात झाले. १२ वीचे शिक्षण शहरातील एसएसव्हीपीएस कनिष्ठ महाविद्यालयात झाले. पदवी तिथेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून प्राप्त केली. स्पर्धा परीक्षेसाठी तिने जळगाव येथील खाजगी क्लासला प्रवेश घेतला होता.
जागतिक महिला दिनाच्या दिवशी तिचा आॅनलाईन निकाल लागला.
ही वार्ता तिच्या आईवडील व अलाने गावकऱ्यांना समजताच गावातील सर्वांनी तिचे अभिनंदन केले. शुक्रवारी ती बाहेरगावी गेली होती. शनिवारी सकाळी १० वाजता ती गावी परतली असता ग्रामस्थांनी तिला अलाने फाट्यावर जाऊन तिला सजवलेल्या घोड्यावर बसवून वाजतगाजत गावात आणले.
गावात प्रत्येक घरून तिचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. नंतर एका छोटेखानी कार्यक्रमात नातेवाईक व पंचक्रोशीतील विविध मान्यवरांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी तिच्या सोबत तिची आई देवकोरबाई, वडील कोमलसिंग गिरासे उपस्थित होते. मुलीचा होत असलेला आदर-सत्कार पाहून तिच्या आईवडिलांसह भाऊ संग्रामसिंग यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. उपस्थितांचे डोळेही पाणावले होते.