धुळे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ७० टक्यांनी घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:42 AM2018-10-23T11:42:09+5:302018-10-23T11:43:37+5:30
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा अंदाज : असमाधानकारक पावसाचा परिणाम, हरभºयाचे क्षेत्र घटणार
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी ९० हजार १९ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र यावर्षी झालेल्या असमाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामातील गव्हाच्या क्षेत्रात ७० तर हरभºयाचे क्षेत्र ६० टक्यांनी घटणार आहे. त्यातल्या त्यात धुळे व शिंदखेडा तालुक्यात गव्हाची लागवडच होऊ शकणार नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून देण्यात आली. रब्बीचे क्षेत्र घटणार असल्याने, खतांची मागणीही कमी होणार आहे.
धुळे जिल्हयात यावर्षी असमाधानकारक पाऊस झालेला आहे. सुरवातीच्या कालावधीत दमदार पाऊस झाल्याने, खरिपाच्या पिकांची स्थिती चांगली होती. मात्र त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला.श्रावण महिना कोरडा गेला. तर परतीच्या पावसानेही दडी मारली. त्यामुळे खरिप पिकांचे जवळपास ५० टक्यांपेक्षा अधिकचे नुकसान झालेले आहे.ज्वारीचे पीक केवळ चारा म्हणूनच हातात आलेले आहे.
धुळे, शिंदखेडा तालुक्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने दुष्काळाची स्थिती आहे. त्याचा परिणाम आता रब्बीच्या लागवडीवर होणार आहे.
लागवडीचे क्षेत्रात घट होणार
कृषी विभागाने उद्दिष्ट निर्धारित केलेले असले तरी पाण्याअभावी रब्बीचे लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गहू व हरभरा या पिकांना पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असते. मात्र यावर्षी पाण्याचा अभाव असल्याने गव्हाचे क्षेत्र ७० टक्यांनी तर हरभºयाचे क्षेत्र ६० टक्यांनी घटणार आहे.
जिल्हा कृषी विभागाने २०१८-१९ या वर्षात रब्बी क्षेत्राचे ९८ हजार १९ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. यात ४३ हजार ९८७ हेक्टर क्षेत्रावर गहू लागवडीचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे शिंदखेडा तालुक्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असतांना तेथे १४ हजार ४०१ हेक्टरवर गहू लागवडीचे उद्दिष्ट आहे. तर त्या खालोखाल साक्री तालुक्यात १२ हजार ८४२, धुळे तालुक्यात ८ हजार ५९७, तर शिरपूर तालुक्यात ८ हजार १३९ हेक्टर क्षेत्रावर लागवड अपेक्षित आहे. हरभºयाची ३२ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. आता पाण्याअभावी हे उद्दिष्ट कसे गाठणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
त्यातही धुळे व शिंदखेडा तालुक्यात पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी गव्हाची लागवड होणे कठीण आहे. फक्त शिरपूर व पिंपळनेर याच भागात पाणी काही प्रमाणात असल्याने त्याठिकाणी थोड्याफार प्रमाणात गहू, हरभºयाची लागवड होऊ शकते असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.