दोन हजाराची लाच स्वीकारतांना बेटावदचा सहायक अभियंता जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 07:58 PM2018-03-07T19:58:16+5:302018-03-07T19:58:16+5:30
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी तक्रारदाराकडून दोन हजार रूपयांची लाच स्वीकारतांना वीज कंपनीचे बेटावद (ता.शिंदखेडा) येथील सहायक अभियंता कांतिलाल भाऊराव सनेर (५७) यास आज रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
तक्रारदार यांच्या वडिलांचे पढावद (ता. बेटावद) येथील घराचे वीजबिल थकीत असल्याने, विज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी त्यांचे वीज मीटर घेवून गेले होते. तक्रारदाराने ते बिल भरून, नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी वीज कंपनीकडे अर्ज केला होता.
नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी सहायक अभियंता कांतीलाल सनेर यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला. बुधवारी सायंकाळी तक्रारदाराकडून २ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना पथकाने पंच, साक्षीदारासमक्ष कांतिलाल सनेर यास रंगेहात पकडले.
ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेककर, पवन देसले, नरेंद्र कुळकर्णी, जयंत साळवे, संतोष हिरे, संदीप सरग, सतीश जावरे, भूषण खलाणेकर, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी,कृष्णकांत वाडीले, सुधीर सोनवणे, शरद काटके, प्रकाश सोनार, संदीप कदम यांच्या पथकाने केली.