अवधान येथे पालकमंत्र्यांची पाठ फिरताच व्यासपीठावर दोन गटांत ‘फ्रीस्टाईल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 11:23 AM2018-12-05T11:23:57+5:302018-12-05T11:25:37+5:30
जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार
आॅनलाइन लोकमत
धुळे : शिवसेना उमेदवारांचा प्रचार करून पालकमंत्री दादा भुसे हे व्यासपीठावरून खाली उतरत असतांनाच किरकोळ कारणावरून दोन गट एकमेकांना भिडले. व्यासपीठावरच त्यांची ‘फ्री स्टाईल’ झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काहीवेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अवधान येथे घडली. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ अवधान गावातील महादेव मंदिर चौकात मंगळवारी रात्री पालकमंत्री दादा भुसे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवसेनेची ही पहिलीच सभा होती.
या सभेत पालकमंत्री दादा भुसे यांनी सभेत धुळे शहर गुंडगिरीमुक्त, भयमुक्त शहर करण्यासाठी शिवसेनेला संधी द्या, असे आवाहन केले. आपले भाषण आटोपून पालकमंत्री व्यासपीठावरून उतरू लागताच सभेत बोलू दिले नाही म्हणून एका तरूणाने हुज्जत घालण्यास सुरूवात केली. पालकमंत्री थोडे अंतर जात नाही तोच दोन गट परस्परांना भिडले. पोलीसासमोरच ही ‘फ्रीस्टाईल’ जवळपास १५ मिनिटे सुरू होती. यात लाथाबुक्क्यांचा वापर करण्यात आला. अचानक घडलेल्या या हाणामारीमुळे उपस्थितांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सभास्थळी केवळ एकच हवालदार उपस्थित होता. पोलिसाने हाणामारी करणाºयांना आवरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र जमावापुढे त्यांचे प्रयत्नही अपूर्ण पडले.
या घटनेमुळे तरूणांचा एक गट मोहाडी पोलीस स्टेशनकडे निघाला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून काहींनी मोहाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी पोहचले.
पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. या परिसरात बंदोबस्त वाढविल्यानंतर परिसरात शांतता झाली. या प्रकरणी एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दुसºयाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान शिवसेनेच्या पहिल्या सभेतच ‘दांगडो’ झाल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान मारामारी नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, ते स्पष्ट झालेले नाही.