कुणी गैरप्रकार करू नये, कुणाला करूही देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:40 PM2018-12-07T12:40:52+5:302018-12-07T12:41:20+5:30

निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख : मतदान वाढीसाठीचे प्रयत्न अभिनंदनीय

Who should not do any wrongdoing, do not let anyone do it | कुणी गैरप्रकार करू नये, कुणाला करूही देऊ नये

कुणी गैरप्रकार करू नये, कुणाला करूही देऊ नये

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
धुळे- महापालिका निवडणूकीसाठी असलेली प्रचाराची मुदत आज सायंकाळी साडेपाच वाजता संपणार आहे़ त्यानंतर भरारी पथके, रात्र गस्ती पथके, पोलीस यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहणार असून मतदारांना प्रलोभने दाखविण्यासारखे कुठलेच गैरप्रकार होऊ नये, यासाठी काटेकोर लक्ष ठेवले जाणार आहे़ मतदारांनी निर्भयपणे मतदान करून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी, असे आवाहन निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांनी केले़महापालिका निवडणूकीसाठी आज प्रचार थांबत असून रविवारी मतदान होणार आहे़ निवडणूकीत सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व कार्यकर्ते तसेच मतदारांनी आचारसंहितेचा भंग होईल, अशी कुठलीच गैरकामे करू नये व कुणाला करूही देऊ नये, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले़ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी  साधलेला संवाद़़़़
प्रश्न : महापालिका निवडणूकीसाठी प्रचाराचा कालावधी आज संपत आहे़ त्यानंतर काही गैरप्रकार समोर आल्यास प्रशासनाची काय तयारी आहे?
सुधाकर देशमुख : महापालिकेने ६ भरारी पथके, निवडणूक निरीक्षक व पोलीसांची पथके थेट कारवाईसाठी नेमली आहेत़ तसेच पोलीस ठाणे निहाय रात्रपथके, संवेदनशिल मतदान केंद्रांवर अतिरीक्त पोलीस बंदोबस्त, ५ ठिकाणी निरीक्षण चौक्या नेमल्या आहेत़ शिवाय ‘कॉप’ अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना देखील सर्व गैरप्रकारांवर लक्ष ठेवता येणार आहे़ 
प्रश्न : मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत?
सुधाकर देशमुख : मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे़ शिवाय मतदान केंद्रातील कर्मचाºयांना कुठल्याही कारणास्तव केंद्रातून बाहेर पडावे लागू नये यासाठी त्यांना जागेवर भोजन उपलब्ध करून दिले जाणार आहे़ एकूण ९९ इमारतींमध्ये ४५० मतदान केंद्र असून सर्व इमारतींमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे ९९ समन्वयक नेमले आहेत़ त्यांच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर लक्ष ठेवले जाईल़ 
प्रश्न : महापालिका निवडणूकीत गेल्यावेळी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत यंदा वाढ होईल, असे वाटते का?
सुधाकर देशमुख : निश्चितच, गेल्या निवडणूकीत ६२ टक्के मतदान झाले होते़ परंतु यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध कार्यक्रम, शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती,  व्होटर सर्च अ‍ॅपव्दारे मतदारांना दिलेली सुविधा, सोशल मीडियाव्दारे केलेली आवाहने यांमुळे मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल़ त्याचप्रमाणे सर्व राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान मतदान वाढीसाठी केलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत़ त्यामुळे मतदानात गेल्यावेळच्या निवडणूकीपेक्षा वाढ होईलच असा विश्वास आहे़
प्रश्न : मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त या नात्याने आपण धुळयात मतदान करणार आहात का?
सुधाकर देशमुख : माझे नाव पुण्यात पिंपरी येथील मतदारसंघात आहे़ त्यामुळे धुळयात मतदान करता येणार नाही, परंतु मी प्रत्येक निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावित असतो़ त्याचप्रमाणे कुणीही मतदानापासून अलिप्त न राहता आपला हक्क बजावणे अपेक्षित आहे़ 
प्रश्न : महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने आपण धुळेकरांना काय आवाहन कराल?
सुधाकर देशमुख : मनपा निवडणूक प्रक्रियेची पूर्ण तयारी प्रशासनाने केली असून सक्षम निवडणूक यंत्रणा कार्यान्वित केली आहे़ अडीच हजार कर्मचाºयांसह पोलीसांचाही मोठा बंदोबस्त असणार आहे़ त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागेल, अशी कुठलीही कृती विविध राजकीय पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते, मतदारांकडून होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी़ कुणी गैरप्रकार करू नये, कुणाला करू देऊ नये़ त्याचप्रमाणे मतदारांना निर्भयपणे हवे त्या उमेदवाराला मतदान करण्यात बाधा आणू नये, निवडणूक यंत्रणेला सहकार्य करून मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडावी, असे आवाहन मी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त या नात्याने सर्वांना करीत आहे़ 

Web Title: Who should not do any wrongdoing, do not let anyone do it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे