प्रेमसंबंधाच्या संशयाचे वातावरण पत्नीने दिली खुनाची फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:04 PM2019-07-01T23:04:35+5:302019-07-01T23:04:56+5:30
म्हसदी शिवार : दोन जणांविरुध्द गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा खून करुन दुचाकीसह त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची खळबळजनक उघडकीस आली आहे़ याप्रकरणी दोन संशयित विरोधात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़
साक्री तालुक्यातील म्हसदी येथील मनीषा योगेश पवार (२२) या महिलेने फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, साक्री तालुक्यातील म्हसदी गावातील आबा चंदू अहिरे याच्या पत्नी बरोबर योगेश नानाजी पवार याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आबा अहिरे याला होता़ त्यातून १२ ते १५ जून दरम्यान आबा चंदू अहिरे आणि त्याचा साथीदार योगेश (पूर्ण नाव माहित नाही) रा़ दरेगाव ता़ बागलाण या दोघांनी साक्री तालुक्यातील म्हसदी शिवारातील काळगाव रस्त्यालगत पंडीत अहिरे यांच्या शेताजवळ योगेश पवारला संशयिताने बोलावून घेतले़ त्याला ठार मारुन त्याच्यासह एमएच १८ एएम ०२८१ क्रमांकाची मोटारसायकल विहिरीत फेकून दिली़ या घटनेनंतर सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ यानंतर रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मयताची पत्नी मनीषा हिने दिलेल्या फिर्यादीवरुन भादंवि कलम ३०२, ५०६, ३४ प्रमाणे वाढीव कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे घटनेचा तपास करीत आहेत़ खुनाची फिर्याद नोंदविल्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे़