भक्कम व्यासपीठ उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 09:29 PM2020-08-30T21:29:22+5:302020-08-30T21:29:40+5:30
युवराज पाटील : कुणबी सेनेच्या विभागीय मेळाव्यात निर्धार
धुळे : शेतकरी व कष्टकऱ्यांच्या सर्वांगिण विकासाकरिता वर्गीय एकजूट करुन भक्कम व्यासपीठ उभारण्यासाठी सर्व कुणबी बांधवांनी राजकीय पक्षाचा त्याग करुन एका झेंड्याखाली एका व्यासपीठावर यावे, असे आवाहन कुणबी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज पाटील यांनी केले़
धुळे येथे एका मंगल कार्यालयात रविवारी आयोजित कुणबी सेनेच्या धुळे जिल्हा विभागीय मेळाव्यात ते बोलत होते़ या मेळाव्यात विविध क्षेत्रातील व्यक्तींची निवड करुन मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला़ या मेळाव्याला शिसाकाचे माजी चेअरमन व्ही़ यू़ पाटील, अमळनेरचे सुरेश पाटील, शिंदखेड्याचे दिपचंद पाटील, सेवानिवृत्त अभियंता बी़ जी़ पाटील, सुरेश पाटील, उत्तर महाराष्ट्र प्रमुख संदिप देवरे, जिल्हाप्रमुख संजय बोरसे, माजी सरपंच दिनेश पाटील, भानूदास महाजन, रोहित पाटील, प्रा़ घनश्याम साळुंखे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते़
खाजगी, उदारीकरणाच्या धोरणामुळे शेतीव्यवसाय कोलमडला आहे़ ऊस, कापूस, केळी, कांदा, भात, सोयाबीन उत्पादक शेतकºयांचे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत़ नैराश्य व कर्जबाजारीपणामुळे राज्यात शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत़ म्हणूनच जमीन, पाणी, रोजगार व विकास या प्रश्नावर व्यापक लढा उभारण्याची गरज युवराज पाटील यांनी व्यक्त केली़ विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत स्थापन झालेल्या कुणबी सेनेचा विस्तार राज्यभर होत असल्याचे ते म्हणाले़