परदेशात शिकणार, 10 लाख रुपये मिळणार, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी योजना
By सचिन देव | Published: February 2, 2024 11:13 AM2024-02-02T11:13:22+5:302024-02-02T11:13:50+5:30
ST Bus: तुटपुंज्या पगारामुळे एसटी कर्मचाऱ्यांना इच्छा असूनही मुलांना विदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविता येत नव्हते. त्यामुळे एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्याच्या मुला-मुलींसाठी `परदेशी शिक्षण अग्रीम योजना` सुरू केली आहे.
- सचिन देव
धुळे - तुटपुंज्या पगारामुळे एसटी कर्मचाऱ्यांना इच्छा असूनही मुलांना विदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविता येत नव्हते. त्यामुळे एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्याच्या मुला-मुलींसाठी `परदेशी शिक्षण अग्रीम योजना` सुरू केली असून, या योजनेंतर्गत परदेशात शिक्षणासाठी एसटी कर्मचाऱ्यांना बिनव्याजी १० लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. एसटी महामंडळाने इतिहासात पहिल्यांदाच हा निर्णय घेतल्यामुळे, या निर्णयाचे स्वागत होत आहे.
...तर व्याज आकारून वसुली होणार
एसटी महामंडळातर्फे पहिल्यादांच कर्मचाऱ्यांच्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी १० लाखांचे बिनव्याजी अनुदान देण्यात येत आहे. ज्या कर्मचाऱ्याने खोटी कागदपत्रे दाखवून या अनुदानाचा दुरुपयोग केल्यास, अशा कर्मचाऱ्याकडून एसटी महामंडळातर्फे १२ टक्के प्रमाणे चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारून हे अनुदान वसूल केले जाणार आहे.
काेणाला मिळणार लाभ, काय आहेत नियम व अटी?
- एसटी महामंडळाचे औद्योगिक संबंध अधिकारी मोहनदास भरसट यांनी गुरुवारी याबाबत आदेश काढला.
- या योजनेमध्ये एसटी महामंडळात जे कर्मचारी कायमस्वरूपी आहेत, अशा कर्मचाऱ्यांच्या मुलांना परदेशातील विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी अनुदान दिले जाणार आहे.
- अनुदानासाठी १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत अर्ज मागविण्यात येणार असून, अनुदान देताना संबंधित एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने परदेशी शिक्षणासाठी ग्राह्य धरण्यात येणाऱ्या जीआरई, टोफेल या प्रवेश परीक्षा उतीर्ण असणे बंधनकारक आहे.
- परदेशातील जी विद्यापीठे जागतिक रँकिंगमध्ये असतील, अशा विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांनाच एसटी महामंडळाकडून अनुदान दिले जाईल.