मानवाच्या कल्याणासाठी जादूटोणा कायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 10:30 PM2018-12-09T22:30:03+5:302018-12-09T22:30:32+5:30
तानाजी शिंदे : आरावे येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : जादूटोणा कायदा हा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नसून मानवाच्या कल्याणासाठी आहे. म्हणून या कायद्याचा वापर केल्यास अनेक भोंदूबाबा गजाआड होतील, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन समितीच्या कार्यक्रमात राज्याध्यक्ष तानाजी शिंदे यांनी केले. तालुक्यातील आरावे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकत्याच आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अंधश्रद्धा ही देशास लागलेली कीड असून सुशिक्षित लोकही अंधश्रद्धा बाळगत असल्यामुळे भोंदूबाबांचे फावते. त्यामुळे भोंदूबाबांचे पितळ उघडे पाडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा व समाज अंधश्रद्धा मुक्त करा, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले. अंगात येणे खोटे आहे. त्यांच्या अंगात इतिहासात होऊन गेलेल्या थोर व्यक्ती का येत नाहीत, असा अंतर्मुख करणारा प्रश्नही उपस्थित केला.
सप्रयोग व्याख्यान असल्याने त्यांनी रुमालाची काठी कशी तयार होते, वस्तू कशी गायब होते, दुधाने भरलेला ग्लास दूध पिल्यानंतरही रिकामाच कसा होत नाही, फाशीतून सुटका, दोरी जोडणे, पत्ते ओळखणे, पत्ते मोठे करणे, बाहुली नाचवणे, निर्जीव वस्तू हलवणे, नाकातून पाणी काढणे ह्यासारखे अचंबित करणारे भरपूर प्रयोग दाखवले व त्यानंतर त्यामागील विज्ञानही सांगितले. विंचू कसा उतरवतात, गाई-म्हशीचे दूध परत कसे आणले जाते, काविळ कसा उतरवला जातो ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांनी आरावे जि.प. शाळेचे कौतुकही केले
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तानाजी शिंदे यांचा सत्कार सरपंच श्री कैलास गिरासे व मुख्याध्यापक पूना नगराळे यांनी केला.कार्यक्रमासाठी गावातील तरुण वृध्द व बाळगोपाळांनी गर्दी केली होती,कार्यक्रमानंतर सर्वांच्या चेहरयावर हसू होते, अत्यंत विनोदी शैलीत तानाजी शिंदे यांनी जादूमागील गुपिते व विज्ञान समजून सांगितले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भटेसिंग गिरासे हे होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंडित पाटील यांनी तर आभार अजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी भगवानसिंग गिरासे, अरुण परदेशी, मंगला पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी परिश्रम घेतले.