टायर नसल्याने रुग्णवाहिका पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:07 PM2019-06-21T23:07:51+5:302019-06-21T23:08:45+5:30
चिमठाणे आरोग्य केंद्र : अनेकवेळा तक्रारी करुनही समस्यांची पूर्तता होत नाही
चिमठाणे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध समस्या असून केंद्रास देण्यात आलेल्या रुग्णवाहीकेचे टायर गेल्या सात-आठ महिन्यापासून जीर्ण झाले असून यामुळे वाहनाचा रुग्णांसाठी उपयोग होत नाही. याबाबत अनेकवेळा तक्रार करुनही जिल्हा परिषदेकडून दखल घेतली गेलेली नाही.
चिमठाणे आरोग्य केंद्रास २० ते २५ गावे जोडली गेली आहेत. मात्र सद्यस्थितीत चिमठाणे आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकेचे जीर्ण टायर वापरून गरज भागवत आहे.
चिमठाणे गावाला लागूनच शिंदखेडा तालुक्याचे ठिकाण असूनही अजून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. याकडे पूर्णपणे दुर्लक्षच असल्याचे स्पष्ट दिसून येते. या मुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. परिसरातील रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णवाहीका उपलब्ध होत नाही व विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या जीवाशी हा खेळ सुरू असून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आरोग्य केंद्रातील जुन्या रुग्णवाहीकेवर उपाय योजना करावी, अशी मागणी चिमठाणे परिसरातून केली जात आहे. ८-९ महिन्यापासून टायरची भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून अजून किती दिवस यासाठी प्रतिक्षा करावी लागेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरोग्य केंद्रात असलेल्या रुग्णवाहिकेमध्ये वेळेवर डिझेल नसते तर कधी गाडी खराब होते. अश्या प्रकारची अनेक कारणे दाखवली जातात व अशा वेळी अपघात झालेला व्यक्ती जीवास मुकतो. असा मनमानी कारभार आरोग्य केंद्रात नेहमीच असतो.
तसेच आरोग्य केंद्रात असलेले अधिकारी हे रात्री उपलब्ध होत नाही. सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिक हैराण होत आहेत. यामुळे परिसरातील आरोग्य केंद्राशी जोडलेल्या २० ते २५ गावांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका वेळेत पोहचत नसल्याने रुग्णास कसे न्यावे असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. जिल्हा परिषदेकडून मिळणारे टायर कधी उपलब्ध केले जातील, अशी चर्चा गावात केली जात आहे.
चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेकांना दुजा भाव केल्याचे कृत्य देखील समोर आले असून अशा अनेक गोष्टींची दखल या अगोदर देखील ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली आहे. चिमठाणे आरोग्य केंद्रास देण्यात आलेल्या रुग्णवाहीकेस त्वरित टायर उपलब्ध करुन सदरची रुग्णवाहीका अद्यावत करावी, अशी मागणी परिसरातून केली जात आहे.