भरधाव ट्रक उलटल्याने महिला डॉक्टर ठार; सरवड शिवारातील अपघात, चालक फरार
By देवेंद्र पाठक | Published: September 8, 2023 04:36 PM2023-09-08T16:36:40+5:302023-09-08T16:37:10+5:30
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगात असल्याने उलटला.
धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगात असल्याने उलटला. त्याखाली दुचाकी सापडल्याने महिला डॉक्टरचा मृत्यू झाला. ही घटना धुळे तालुक्यातील सरवड शिवारात शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. डॉ. आदिती जोगळेकर-सोनवणे (वय ३५) असे मयत महिला डॉक्टरचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच सोनगीर ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती.
सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दंत वैद्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. आदिती जोगळेकर-सोनवणे या शुक्रवारी सकाळी एमएच १८-बीव्ही ०७५१ क्रमांकाच्या दुचाकीने धुळ्याहून सोनगीरच्या दिशेने निघाल्या होत्या. त्याच वेळेस धुळे तालुक्यातील सरवड फाट्याजवळ पाठीमागून येणारा आरजे ११-जीबी ८१६० क्रमांकाचा भाजपाल्याने भरलेला ट्रक उलटला. त्याखाली डॉ. आदिती यांची दुचाकी सापडली. त्यात त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताचे वृत्त कळताच सरवड आणि सोनगीर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पाठोपाठ सोनगीर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड आणि कर्मचारी दाखल झाले. महिला डॉक्टरला ट्रकच्या बाहेर काढून रुग्णवाहिकेने सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तपासून तिला मयत घोषित करण्यात आले.
महामार्गावर ट्रक उलटल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या मदतीने ट्रक बाजूला करण्यात आला. डॉ. आदिती जोगळेकर यांचे पती डॉ. मनोज सोनवणे हेदेखील डेंटिस्ट आहेत. पाच वर्षांपूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. डॉक्टर दाम्पत्य धुळ्यातील जीटीपी चौकाजवळ वास्तव्यास आहे.