बसमधून महिलेची पर्स शिताफिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 10:53 PM2020-01-03T22:53:25+5:302020-01-03T22:53:42+5:30
शिरपूर : १७ हजाराची होती रोख रक्कम
शिरपूर : येथील बसस्थानकातील बसमधून एका महिलेची पर्स चोरट्याने लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली़ या पर्समध्ये १७ हजाराची रोख रक्कम होती़ याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला़
शिरपूर तालुक्यातील मांडळ येथील लक्ष्मीबाई भरत ठाकरे (३२) या महिलेने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे़ शिरपूर येथील बसस्थानकामध्ये एमएच ०६ - ८७७२ क्रमांकाची बस उभी होती़ या बसमधील शिटावर लक्ष्मीबाई ठाकरे यांनी आपली पर्स ठेवली होती़ गर्दीचा फायदा घेत या महिलेची नजर चुकवत चोरट्याने आपली हातसफाई केली़ पर्स चोरट्याने लांबविली़ चोरीची ही घटना गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली़ चोरट्याने लांबविलेल्या पर्समध्ये १७ हजाराची रोकड होती़ चोरीची ही घटना लक्षात आल्यानंतर या महिलेने आरडाओरड केली़ पण, तो पर्यंत चोरट्याने घटनास्थळावरुन पळ काढला होता़
चोरीच्या या घटनेनंतर या महिलेने थेट शिरपूर शहर पोलीस ठाणे गाठले आणि पर्स लांबविल्याप्रकरणी चोरीची फिर्याद दाखल केली़ त्यानुसार चोरट्याविरुध्द भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस हेड कॉन्स्टेबल यु़ जी़ पाटील घटनेचा तपास करीत आहेत़ चोरट्याचा ठावठिकाणा लागलेला नाही़