अवैधरित्या वृक्ष कत्तल करुन लाकडाची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:50 PM2019-03-19T22:50:16+5:302019-03-19T22:50:53+5:30
सोनगीर : वनविभागाकडून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
सोनगीर : धुळेरोडवरील बसथांब्याजवळ अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर वन विभागाने कारवाई करुन सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लाकडाची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन येथील वनविभागाच्या पथकाने १७ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास धुळेरोडवरील बस थांब्याजवळ वाहनांची तपासणी केली. दरम्यान, शासकीय परवानगी न घेता अवैधरित्या निंब वृक्षाची कत्तल करुन विना परवाना लाकडाची वाहतूक करणाऱ्या एम.एच.१८ झेड.९१२५ क्रमांकाचे ट्रॅक्टर व एम.एच.१८ झेड.८७४६ क्रमांकाच्या ट्रॉलीवर कारवाई करण्यात आली. ट्रॅक्टर चालक चुनीलाल मालचे (३५) रा.सोनगीर यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ६.५०० घनमीटर निंब वृक्षाचे लाकूड आढळून आले. या लाकडाची किंमत व वाहन असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धुळे उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर वन विभागाचे वनपाल एस.ओ. पाटील यांच्या पथकाने ही करवाई केली.