धुळे तालुक्यात विकेंद्रीत सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी : आमदार कुणाल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:17 AM2021-01-24T04:17:37+5:302021-01-24T04:17:37+5:30
धुळे तालुक्यातील कृषिपंपासह गावातील विजेचे प्रश्न सुटावेत म्हणून आ. कुणाल पाटील आणि जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत महावितरण कंपनीच्या ...
धुळे तालुक्यातील कृषिपंपासह गावातील विजेचे प्रश्न सुटावेत म्हणून आ. कुणाल पाटील आणि जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना अखंडीत वीज पुरवठा झाला पाहिजे, यासाठी अचूक नियोजन करण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी दिल्या. बैठकीत बोलताना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले की, धुळे तालुक्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत विकेंद्रीत सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांसाठी तालुक्यात योग्य जागेची निवड करून सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या कामास गती द्यावी. या प्रकल्पामुळे विद्युत वितरण उपकेंद्राशी थेट जोडलेल्या विकेंद्रीत सौरऊर्जा प्रकल्पातून कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यातून ८ तास वीज पुरवठा करण्यात येईल. त्याचप्रमाणे वीज वितरण हानी घटविणे आणि ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर खर्च टाळणे इत्यादी लाभ होणार आहेत. धुळे तालुक्यात जागेची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय यादव यांनी तहसीलदार तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. धुळे तालुक्यात अनेक ठिकाणी नवीन ट्रान्स्फार्मर व विद्युतखांब बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम वेळेवर न करणाऱ्या ठेकेदाराचे नाव काळ्या यादी टाकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. दरम्यान, धुळे तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या नवीन ५० ट्रान्स्फार्मरची खरेदी प्रक्रिया त्वरित सुरू करण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी यावेळी दिल्या. बैठकीत तालुक्यातील विजेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करुन ते तातडीने सोडवावेत तसेच शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, अशाही सूचना आ. कुणाल पाटील यांनी दिल्या. बैठकीला आ. कुणाल पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी संजय यादव, कार्यकारी अभियंता के. एस. बेले, अति. कार्यकारी अभियंता एन. बी. गांगुर्डे, अति. कार्य. अभियंता इंगळे, उपकार्यकारी अभियंता खिरवाडकर, जिल्हा नियोजन अधिकारी हाटकर, अशोक सुडके, किर्तीमंत कौठळकर, शशिकांत रवंदळे आदी उपस्थित होते.