सृजनशील विचार करुन ध्येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 10:21 PM2019-01-09T22:21:27+5:302019-01-09T22:21:48+5:30
विजयसिंग पवार : शिंदखेडा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या युगात स्पर्धा वाढत आहेत. यात विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता अंगी असलेल्या कौशल्याचा वापर राष्ट्रनिमार्णासाठी केला पाहिजे. यासाठी सृजनशीलतेचा विचार करुन स्पर्धा परीक्षेत नेत्रदिपक यशासाठी कठोर परिश्रम करणे ही आजची मौलीक गरज आहे, असे प्रतिपादन अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक विजयसिंग पवार यांनी केले.
श्री.शि.वि.प्र. संस्थेचे महाविद्यालय शिंदखेडा येथे राज्यशास्त्र अभ्यास परिषदेमार्फत आयोजीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पदवी परिक्षेला भरपूर गुण पाहिजेत असे नाही.
कमी गुण असूनही जर सामान्य ज्ञानाचा नीट अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे आहे. ‘कठीण’ शब्द मनातून काढून टाका. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाऊन राष्ट्राची सेवा करावी. खरा भारत हा खेड्यातच असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेचे उद्घाटन विजयसिंग पवार यांनी दिपप्रज्वलन करुन केले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे शिक्षक भारतीचे अध्यक्ष प्रा.पी.के. पाटील (अमळनेर), प्राचार्य डॉ.बी.आर. चौधरी, आयोजक डॉ.संभाजी पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.एस.के. जाधव, प्रा.आर.एन. पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी भुषण बागुल आदि उपस्थित होते. डॉ. संभाजी पाटील यांनी सांगितले की, स्पर्धा परिक्षेविषयी ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये जागर जाणीव व्हावी व स्पर्धा परीक्षा जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी द्यावी म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रा.पी.के.पाटील यांनी 'कौशल्य विकास व स्पर्धात्मक युग' या विषयावर मार्गदर्शन केले. प्रशासनामध्ये लाखो जागा रिक्त असून त्यासाठी प्रत्येकाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.बी.आर. चौधरी स्पष्ट केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पी.पी.पाटील, डॉ.पी.पी. माहुलीकर, कुलसचिव डॉ.बी.बी. पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. भटू देसले, पंकज साळुंखे, दिसा ठाकरे, विशाल बैसाणे, कल्याणी महाले यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेत ३८७ विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला.