धुळे जिल्ह्यात यंत्रणा लागल्या कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:30 PM2020-05-25T12:30:18+5:302020-05-25T12:30:41+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : दोन हजार ४३१ कामांवर तब्बल ११ हजार ८०० कामगारांना मिळाला रोजगार

Work started in Dhule district | धुळे जिल्ह्यात यंत्रणा लागल्या कामाला

dhule

Next

प्रभाव लोकमतचा
धुळे : शासन आणि प्रशासनाच्या आदेशानंतरही यंत्रणांची उदासिनता कायम असल्याने लोकमतने १४ मेच्या अंकात ‘लॉकडाउनच्या बेरोजगारीत यंत्रणा स्तरावर शून्य कामे’ या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खळबडून जाग्या झाल्याआहेत. २२ मेपर्यंत यंत्रणांनी दहा कामे सुरु केली असून या कामांवर ८२ मजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे़
गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत कामांची संख्या शेकडो पटींनी वाढली आहे़ दहा मेपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर ४०४ कामांवर एक हजार ८९२ मजुरांची उपस्थिती होती़ तर लोकमतमध्ये वृत्त झाल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरील कामांनाही गती देण्यात आली़ ग्रामपंचायत स्तरावर २२ मेपर्यंत तब्बल दोन हजार ४२१ कामे सुरु झाली असून या कामांवर सुमारे ११ हजार ७१८ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे़
यंत्रणा स्तरावरील कामे
प्रशासकीय यंत्रणेतील केवळ कृषी विभागाने कामे सुरु केली आहेत़ धुळे तालुक्यात तीन कामांवर २४ मजूर, साक्री तालुक्यात पाच कामांवर ३९ मजूर, शिंदखेडा तालुक्यात दोन कामांवर १९ मजूरांची उपस्थिती आहे़ शिरपूर तालुक्यात कृषी विभागाचे एकही काम सुरु नाही़ तसेच यंत्रणेतील पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम रस्ते, जिल्हा परिषद बांधकाम रस्ते, सार्वजनिक बांधकाम रोहयो, जलसंधारण वनीकरण, सामाजिक वनीकरण या विभागांनी अजुनपर्यंत जिल्ह्यात एकही काम सुरु केलेले नाही़ या विभागांची उदासिनता कायम असल्याचे चित्र आहे़
ग्रामपंचायत स्तरावरील कामे
धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे सुरु झाली आहेत़
धुळे तालुका
या तालुक्यात रस्त्यांची दहा कामे सुरु असून १४८ मजूरांची उपस्थिती आहे़ जलसंधारण ३२ कामांवर ४०२ मजूर, घरकुलाच्या ४८० कामांवर दोन हजार ६२ मजूर, कृषी विभागाच्या २५ कामांवर १०९ मजूर, इतर पाच कामांवर २० मजुरांची उपस्थिती आहे़
साक्री तालुका
ग्रामपंचायत स्तरावरील रस्त्याच्या १५ कामांवर १२५ मजूर, जलसंधारणाच्या २२ कामांवर तीनशे मजूर, घरकुलाच्या एक हजार २५ कामांवर चार हजार १३५ मजूर, कृषीच्या ३९ कामांवर २११ मजूर आणि इतर दोन कामांवर नऊ मजुरांची उपस्थिती आहे़
शिंदखेडा तालुका
रस्त्यांच्या १३ कामांवर २१९ मजूर, जलसंधारणाच्या ४५ कामांवर ५९० मजूर, घरकुलाच्या १७६ कामांवर ६४३ मजूर, कृषीच्या १५ कामांवर ३३ मजूर आणि इतर एका कामावर पाच मजुरांची उपस्थिती आहे़
शिरपूर तालुका
शिरपूर तालुक्यात रस्त्यांच्या चार कामांवर २४२ मजूर, जलसंधारणाच्या एका कामावर १२ मजूर, ४९६ कामांवर दोन हजार ४१६ मजूर, कृषीच्या १४ कामांवर २८ मजूर आणि इतर एका कामावर नऊ मजुरांची उपस्थिती आहे़
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे़ सर्व उद्योग, व्यवसाय आणि व्यापार ठप्प झाले आहेत़ त्यामुळे रोजगारही बंद झाला आहे़ महानगरांमधील मजुर आपआपल्या गावी परतले आहेत़ ग्रामीण भागातील नेहमीचे मस्टरवरचे मजुर आणि आता नव्याने महानगरांमधून आलेल्या या मजुरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी केंद्र शासनाने रोजगार हमी योजनेची कामे लॉकडाउनमधून वगळण्याचा निर्णय घेतला असून रोहयोची कामे सुरू करण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांचा प्रश्न सुटला आहे़
विशेष म्हणजे चालु आर्थिक वर्षात एक एप्रिलपासुन रोहयो मजुरांच्या रोजंदारीत ३२ रुपयांची वाढ करुन केंद्र शासनने लॉकडाउनच्या काळात ग्रामीण मजुरांना मोठा दिलासा दिला आहे़ केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने ही वाढ जाहीर केली आहे़ गेल्या वर्षी मजुरांना २०६ रुपये मजुरी मिळत होती़ परंतु आता २३८ रुपये मिळणार आहेत़
कामांची संख्या वाढवून जास्तीत जास्त गरजू मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत़ प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांशी समन्वय साधून पाठपुरवा केला जात आहे़ इतरही विभागांना कामे सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत़
- गोविंद दाणेज,
उपजिल्हाधिकारी, रोहयो

Web Title: Work started in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे