घराच्या ओढीने मजुरांची पायपीट सुरुच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 09:42 PM2020-04-27T21:42:50+5:302020-04-27T21:43:12+5:30

धसका कोरोनाचा : मुंबई-पुण्याहून पायी निघालेल्या मजुरांची हृदयद्रावक आपबीती

Workers' pipeline continues due to home cravings! | घराच्या ओढीने मजुरांची पायपीट सुरुच!

घराच्या ओढीने मजुरांची पायपीट सुरुच!

Next

धमाणे : पोटात अन्नाचा कण नाही, चालायला पायात त्राण राहिला नाही, कोणी खायला देत नाही, कोणी थांबू देत नाही, पोलीस पुढे जाऊ देत नाहीत, वाहनामध्ये जाता येत नाही आणि कोरोनाचे संकट थांबता थांबत नाही. यामुळे आपली उपासमार निश्चित आहे म्हणून आपल्या गावाकडे गेलेले बरे या मानसिकतेतून या अनेक संकटांशी सामना करत मुंबई येथे मोलमजुरी करणारे अनेक शेकडो मजूर लॉकडाउनचा दुसरा टप्पा घोषित झाल्यानंतर संकटातून बाहेर पडून जिल्हा सीमा बंदीचे आदेश धुडकावून फक्त आणि फक्त आपल्या घराकडे यांचे पाय जाण्यास निघाले आहेत, तेही पायी.
कोणी सायकलीवर तर कोणी ज्याला मिळेल त्या वाहनाने हा प्रवास करत आहे़ हे प्रवासाचे अंतर आहे केवळ सुमारे सतराशे ते दोन हजार किलोमीटऱ हे कामगार निघालेले आहेत मुंबई भिवंडी येथून, ते ही थेट आपल्या गावाकडे़ म्हणजेच उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश या राज्यातील अलाहाबाद, कानपूर, लखनऊ, आग्रा, काशी इत्यादी ठिकाणी.
हृदय हेलावून सोडणारी हे दृश्य सध्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सध्या दिसत आहे. पाच सहा दिवसापासून दररोज हे दृश्य दिसत आहे. भर दुपारी उन्हाच्या तडाख्यात रस्ता सुनसान असतो. रात्री मात्र शीतल छायेत हा रस्ता आवाज करत असतो़ हा आवाज असतो या पायी जाणाऱ्या मजुरांचा़ या मजुरांच्या जथ्या मध्ये अनेक तरुण म्हातारे यांच्या सोबतच अनेक महिला त्यातच काही महिला या गरोदर सुद्धा आहेत़ याशिवाय त्यांच्या बालकांचा समावेश आहे. रोजगारासाठी मुंबईमध्ये देशभरातून अनेक जण येतात़ कोरोनाच्या संकटामुळे पहिल्या लॉकडाउन काळात 14 एप्रिल पर्यंत सर्व काही ठीक होईल, या आशेने सर्व मजूर हे आपापल्या कामाच्या ठिकाणीच थांबून होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन २ घोषित करून ३ मेपर्यंतची मुदत दिली. मात्र, पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी न होता वाढतच आहेत़ त्यामुळे येथील परिस्थिती नियंत्रणात लवकर येणार नाही, अशी चिन्हे दिसू लागताच या ठिकाणी उपाशीपोटी थांबलेल्या मजुरांनी शेवटी आपापल्या घरांचा रस्ता स्विकारणे पसंत केले आहे़ आपल्या घराकडे निघताना त्यांना संकट आहे, जिल्हा बंदीचे आणि संचार बंदीचे़ परंतु या संकटांना तोंड देऊन हे मजूर आपल्या गावाकडे निघाले आहेत़ त्यांनी आपबीती सांगताना सांगितले की आम्हाला रस्त्याने अनेक संकटे येतात़ अनेक ठिकाणी पोलिसांनी अडवले़ चोर मार्गांनी रात्री निघालो, रस्त्यामध्ये कोणते वाहन थांबत नाही आम्हाला कुणी थांबण्याचा प्रयत्न केला तर ते आम्हाला क्वारंटाईन करण्याचा प्रयत्न करतात, ते पण नाही आम्ही कशी तरी सुटका करतो़ थांबलं तर दिवस जाईल चाललं तर चालला जाणार नाही अशा अवस्थेत हे सगळे मजुर आपल्या गावाकडे निघाले आहेत. त्यांना आस आहे ती फक्त आणि फक्त आपल्या घरी पोहोचण्याची.
अजून त्यांचे संकट थांबलेले नाही़ कारण ते घरी सुखरूप केव्हा पोहोचतील? रस्त्यात कोणी अडवलं तर, पोहोचले तर त्यांच्या गावांमध्ये त्यांना प्रवेश मिळेल का? तेथेसुद्धा सीमा बंदी गावबंदी केलेली असेल, हे कामगार पुण्या-मुंबईहून आलेले आहेत़ यांना कोरोनाची लागण तर झालेली नाही ना, अशी भीती त्यांच्या ग्रामस्थांना असेल आणि जर पोचले तर तेथेही त्यांना वैद्यकीय चाचणीनंतर होम क्वारंटाईन व्हावे लागेल़ अशा एक ना अनेक संकटांतून हा प्रवास सुरूच आहे, तो केव्हा थांबेल हे काळच ठरवेल. दरम्यान, हे मजूर कोणत्या ठिकाणाहून येत आहेत़ कोणत्या दिशेला चालले आहेत, याची माहिती प्रशासनाने घेऊन निवारासह भोजनाची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे़
ट्रकमध्ये गुदमरण्यापेक्षा पायी चाललेले बरे़़़़़
आपल्या प्रवासादरम्यान त्यांच्याजवळ कोणी जात नाही़ कारण जो जवळ जाईल त्याला कोरोनाची भीती आहे़ वाहनधारक बसवत नाही़ कारण, वाहन तपासणी झाली तर वाहनधारकांवर कारवाई होईल़ म्हणून हे बिचारे पायीच निघालेले आहेत. अनेकांच्या पायाचे पायतन चालून चालून तूटले आहे़ नवीन पायतन मिळत नाही, कारण दुकान बंद आहेत़ म्हणून अनेक जण अनवाणी चालताना दिसले़ अनेकांनी आपल्या सायकलीसोबत घेतल्या आहेत़ सायकलने प्रवास सुरु केला़ नाशिक मुक्कामी थांबताना एका प्रवाशाचे पाच हजार रुपये भाडे कबूल करूनही कुणी आम्हाला गाडीत बसवले नाही अशी खंत सुद्धा या तरुणांनी व्यक्त केली. काहीही मालट्रक धारकांना दया आली तर तेसुद्धा आपल्या वाहनात बसवतात़ मात्र चारही बाजूने ताडपत्री बंद असते़ त्यामुळे आत गुदमरून मरण्यापेक्षा पायी चाललेले बरे म्हणून तेथेही बसता येत नाही, अशा एक ना अनेक संकटांची मालिका या पायी जाणाऱ्यांनी व्यक्त केली़

Web Title: Workers' pipeline continues due to home cravings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे