योग साधनेतून विश्वशांतीचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:50 PM2019-06-21T22:50:12+5:302019-06-21T22:50:52+5:30
जागतिक योग दिन : धुळे येथे पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य कार्यक्रम; ५ हजार साधकांचा योगाभ्यास
धुळे : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी अपूर्व उत्साहात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यादिवशी आबालवृद्धांसह शालेय विद्यार्थ्यांनीही प्रशिक्षित योग शिक्षकांच्या माध्यमातून विविध योगासने केली. योग साधनेच्या माध्यमातून विश्वशांतीचा संदेश देण्यात आला. योगासने करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला.
पोलीस मुख्यालय
जिल्हा प्रशासन व आंतरराष्ट्रीय योग दिवस संयोजन समिती यांच्यातर्फे पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जागतिक योग दिनाचा मुख्य कार्यक्रम झाला. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस, रवी बेलपाठक, संजय चौधरी, ओमप्रकाश खंडेलवाल आदी उपस्थित होते. डॉ. राजेंद्र निकुंभ यांनी योग प्रात्यक्षिकांचे महत्व विशद करीत संचलन केले. ओम खंडेलवाल यांनी योग दिनाचे महत्व विशद केले. ‘ॐ’काराने योग दिनाची सुरूवात झाली. प्रशिक्षकांच्या माध्यमातून विविध आसने करण्यात आली. या कार्यक्रमात शहरासह परिसरातील सुमारे पाच हजार नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बिस्किटाचे वाटप करण्यात आले.
डॉ. आंबेडकर हायस्कूल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवपूर धुळे येथे योग विद्याधाम देवपूर येथील लक्ष्मण दहिहंडे व किमया दहिहंडे यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. योगाचे होणारे लाभ विद्यार्थी व शिक्षकांना सांगितले. या कार्यक्रमाला प्राचार्य एस. जी. सिसोदिया, पर्यवेक्षक आर. एन. पाटील आदी उपस्थित होते.
बाफना प्रायमरी स्कूल
श्रीमती सुंदरबाई छगनलाल बाफना प्रायमरी स्कुलमध्ये मनीषा ठाकूर यांच्या मार्गदर्शनात योगासने घेण्यात आली. मुख्याध्यापिका तारा गोसावी, यांनी रोज योगाभ्यास करावा, ज्यामुळे शरीर सुदृढ राहते. योगाचे फायदेही त्यांनी विषद केले.
सिंधुरत्न शाळा
सिंधुरत्नज एस.व्ही.सी. (महात्माजी) इंग्लिश स्कूल येथे शाळेतील इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी योगासने, प्राणायम केली. त्यांच्यासोबत शाळेचे संचालक तसेच शिक्षक, शिक्षिकांनी योगासने केली. टीना तनेजा, पूर्वा परदेशी यांनी योगाचे प्रात्याक्षिक करून दाखविले. जेठानंद हासवाणी, मुख्याध्यापक खान, मुख्याध्यापिका शालिनी मंदाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता नियमित योगा करू अशी प्रतिज्ञा घेतली.
आदर्श प्राथमिक मंदिर
येथे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी योगासनांची प्रात्याक्षिके केली. त्याचबरोबर प्राणायम, ध्यानधारणा याचेही महत्व जाणून घेतले. यावेळी मुख्याध्यापक धनराज दाभाडे उपस्थित होते. कृष्णा पाडवी यांनी प्रशिक्षण दिले.