एकवीरादेवी मंदिरात कुमारीकांचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 04:12 PM2017-09-24T16:12:08+5:302017-09-24T16:13:22+5:30
ललिता पंचमी : मारवाडी युवा मंच, अग्रवाल समाज महिला मंडळातर्फे आयोजन; १०१ कुमारिका उपस्थित
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : खान्देशची कुलस्वामिनी माता एकवीरादेवी मंदिरात रविवारी चौथ्या माळेला सकाळी ११ वाजता १०१ कुमारिकांचे पूजन करण्यात आले. मारवाडी युवा मंच व अग्रवाल समाज महिला मंडळातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अशी आहे अख्यायिका
रविवारी चौथी माळ व ललित पंचमी होती. या दिवशी औचित्य आदिशक्तीला बाल्य रूपात पाहिले जाते. त्यामुळे २ ते ९ वर्षाआतील कुमारिकांचे पूजन करण्याची परंपरा आहे. हा उपक्रम शहरातील मारवाडी युवा मंच व अग्रवाल समाज महिला मंडळातर्फे गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे. कुमारिका पूजन सुरू असताना त्यांच्या अंगावर काटे आल्यासारखे वाटले तर आई एकवीरादेवीचा आशीर्वाद आहे, असे मानले जाते.
कुमारिकांना दिला महाप्रसाद
कुमारिका पूजन झाल्यानंतर मंदिरात उपस्थित १०१ कुमारिकांना महाप्रसाद देण्यात आला.
यावेळी आरती झाली. मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी मधुकर गुरव, मनोहर गुरव, सदाशिव पुजारी, चंद्रशेखर गुरव आदी उपस्थित होते.
गर्दीने फुलला मंदिर परिसर
रविवारी सुट्टीचे औचित्य साधून पहाटेपासूनच मंदिरात गर्दी दिसून आली. शहरातील अनेक भाविक पदयात्रा करत मंदिरात दर्शनासाठी आले. सकाळी नऊ वाजता आदिशक्तीच्या गाभाºयात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे मंदिर परिसर फुलल्याचे चित्र दिसून आले. आज दिवसभरातही गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील भाविकांनीही दर्शन घेतल्याची माहिती मंदिर ट्रस्टतर्फे देण्यात आली.
आकर्षक विद्युत रोषणाईने
मंदिर परिसरात लखलखाट
खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे मंदिर परिसर उजळून निघालेला दिसत आहे. याच परिसरात असलेल्या महालक्ष्मी मंदिरालाही केलेल्या रोषणाईमुळे मंदिर परिसरात लखलखाट दिसत आहे.
यानिमित्ताने येथे दाखल झालेले पाळणे, रेल्वे, मिकी माऊस, वॉटर टॅँक लहान मुलांचे लक्ष वेधत असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे.