यंदा बैल पोळा मानाच्या मिरवणुका रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 03:05 PM2020-08-19T15:05:39+5:302020-08-19T15:09:10+5:30

पोळा सणावर कोरोनाचे सावट : पिंपळनेर येथे कार्यक्रम रद्द, जिल्हाभरात साध्या पद्धतीने सर्जा-राजाप्रति कृतज्ञता

This year, the procession of bulls was canceled | यंदा बैल पोळा मानाच्या मिरवणुका रद्द

dhule

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हाभरात यंदा पोळा सणावर कोरोना संसर्गजन्य आजाराचे सावट दिसून आले. पिंपळनेर येथे यंदा मानाची मिरवणूक रद्द करण्यात आली. ठिकठिकाणी साध्या पद्धतीने पोळा सण साजरा करुन सर्जा-राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
बैल पोळा मानाच्या मिरवणुका रद्द
पिंपळनेर- कोरोना संसर्गजन्य आजारामुळे येथील दोन समाजाच्या बैलपोळा मानाच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या. साध्या पद्धतीने घरीच बैल पूजन करून पोळा सण साजरा करण्यात आला आहे.
वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. मात्र, यंदा प्रथमच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पोळा सणाच्या मिरवणुकांची परंपरा खंडित झाल्याचे पाहण्यास मिळाले.
पिंपळनेर येथे पोळा सण ऐतिहासिक परंपरेनुसार वैशिष्टयपूर्ण रितीने साजरा केला जातो. येथील पोळा फोडण्यासाठी गुलाल उधळीत वाजत-गाजत मराठा पाटील समाज व सगरवंशीय जिरे पाटील समाजाची मानाची मिरवणूक काढण्यात येते व ही परंपरा अजूनही मोठ्या उत्साहाने कायम असते.
परंतू यंदा संपूर्ण देशात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने प्रशासनाने मिरवणूका न काढता, गर्दी न करता सण साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे महिलांनी साध्या पद्धतीने आरती पूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखवत पोळा सण साजरा केला.
थाळनेर परिसरात निरुत्साह
थाळनेर- शिरपूर तालुक्यातील थाळनेरसह परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोळा सणावर निरुत्साहाचे वातावरण दिसून आले.
यावर्षी देशात मार्च महिन्यापासून कोरोनामुळे आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली. लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले. या संसर्गजन्य आजाराने ग्रामीण भागात शिरकाव केल्याने ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. तर काही रुग्णांना या संसर्गजन्य आजारामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. अशीच परिस्थिती थाळनेर गावात निर्माण झाल्याने यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा करण्यात निरुत्साह दाखविल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
पोळा सणाला बैलाला सजवून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या बैल जोडींची सवाद्य मिरवणूक काढली जाते. त्यानंतर इतर शेतकरी आपल्या बैलांची मिरवणूक काढत मारुतीच्या पाराला फेरी मारून घरी येऊन शेती अवजारांची व बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचे नैवेद्य खाऊ घालतात. परंतू यावर्षी कोरोनामुळे परिसरात विपरीत परिस्थिती निर्माण झाल्याने पोळा सणाला निरुत्साह दिसून आला. त्यामुळे बाजारपेठेत देखील जास्त प्रमाणात उलाढाल झाली नाही.
नवागाव येथे बैल पूजन
शिरपुर- तालुक्यातील नवागांव (बुडकी) येथे पोळा सणानिमित्त गावातील मुख्य चौकात बैलाची पुजा करण्यात आली. त्यानंतर गावातील हनुमान मंदिराच्या पाराला फेरी मारुन मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणुकीची बुडकी येथे सांगता झाली. तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासी बांधवांच्यावतीने मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला.
यावेळी जितेंद्र पावरा, पोलीस पाटील लक्ष्मण पावरा, मंगळ पावरा, अनिल पावरा, जयदास पावरा, रमेश पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते.
रोहिणी येथे पूजन
शिरपूर-तालुक्यातील आदिवासी परिसरासह रोहिणी भागात पोळा सण साजरा करण्यात आला.
ग्रामीण भागात पोळा सणाच्या पाच दिवस अगोदरपासून बैलांना कोणतेही जड कामाला लावत नाहीत. पोळा सणाच्या दिवशी सजवून मिरवणूक काढण्यात येते. पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.
कापडणे येथे निरुत्साह
कापडणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी खबरदारी घेत बैलांची घरीच सजावट करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला. दरवर्षी वाद्यांच्या गजरात गावातून सजविलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात येते. यंदा कोरोनामुळे मात्र, निरुत्साह दिसून आला.
पटेल सीबीएसई स्कूल
शिरपूर- शहरातील अमरिशभाई आर.पटेल सीबीएसई स्कूलमध्ये पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना बैलपोळा सणाचे महत्त्व आॅनलाईन अ‍ॅपद्वारे समजावून सांगण्यात आले. यावेळी लक्ष्मण पाटील यांनी विद्यार्थ्यांना बैलपोळा साजरा करण्याची पद्धत तसेच महत्व समजावून सांगितले.
पूर्वप्राथमिक विभागातील मंजुषा पाटील यांनी पॉवरपॉइंटद्वारे या सणाविषयी सविस्तर माहिती दिली. सिमा लिनाडे व मनीषा कलाल यांनी पारंपारीक वेशभूषा परिधान करून बैलपोळ्यावर आधारित सुंदर व हृदयस्पर्शी नाटिका सादर करून विद्यार्थ्यांना पोळा सणाचे महत्व सांगितले.
यावेळी प्राचार्य निश्चल नायर व उपप्रचार्या अनिता थॉमस यांनी बैलांची पूजा करुन गहू, गूळ व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले. सुंदर व आकर्षक फलक लेखन दिपक पाटील, प्रशांत पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Web Title: This year, the procession of bulls was canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.