गरबा, दांडिया स्पर्धेत तरुणांची धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 03:22 PM2017-09-26T15:22:02+5:302017-09-26T15:24:08+5:30
उत्साह : पहाटेपासून येणाºया भाविकांच्या गर्दीने रस्ते गजबजले; मंडळांतर्फे गरबा व दांडिया स्पर्धांचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नवरात्रोत्सवामुळे शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे. विविध भागातील मंडळांतर्फे गरबा, दांडिया स्पर्धांचा आयोजन केले जात आहे. या स्पर्धांमध्ये तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होत असून त्यांच्यातील कलाविष्कार सादर करीत आहे. तर शहरातील अनेक भाविक आदिशक्ती एकवीरा देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच अनवाणी पायाने मंदिरात जाताना दिसून असून त्यामुळे शहरातील रस्ते गजबजल्याचे चित्र दिसून येत आहे.
दर्शनासाठी भाविकांची रीघ
नवरात्रोत्सवात शहरातील एकवीरादेवी मंदिरात पहाटे साडे चार वाजेपासून दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील अनेक कुटुंबातील सदस्य त्यांच्या मनातील इच्छापूर्तीसाठी केलेला नवस फेडण्यासाठी मंदिरात येत आहे.
तर नवसपूर्ती झाल्यामुळे दरवर्षी नवरात्रोत्सवात अनवाणी पायाने घटस्थापना ते दसरा या सणापर्यंत न चूकता येत असतो, अशी माहिती प्रभाकर चौधरी, किरण पाटील, प्रफुल्ल पाटील यांनी दिली आहे. आदिशक्ती एकवीरादेवी मंदिरात २८ रोजी नवचंडी होम होणार असून भाविकांची लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आदिशक्तीच्या जयघोषाने दुमदुमला परिसर
पहाटेपासूनच मंदिरात गर्दी होत असल्यामुळे एकवीरादेवी मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले ठेवण्यात येत आहे. पहाटेपासून होणारी गर्दी दुपारी माध्यान्ह आरतीपर्यंत कायम राहत असून भाविकांच्या गर्दीमुळे मंदिराचा परिसर फुलून गेला आहे. शहरातील देवपूर परिसर, साक्रीरोड, पारोळारोड, आग्रारोड, बारापत्थर, दसेरा मैदान, मोहाडी, नगावबारी, वाडीभोकर, दत्तमंदिर परिसरातून पहाटे दर्शनासाठी येणारे भाविक आदिशक्तीचा जयघोष करित मंदिरात दर्शनासाठी येत आहेत.
जिल्हाभरातील मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम
जिल्ह्यातील सर्व देवींच्या मंदिरांवर नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. विविध धार्मिक कार्यक्रम जिल्ह्यातील पेडकाई देवी, इंदाई देवी, म्हाळसा देवी, भवानी माता, चामुंडा माता, बिजासनी माता, कालिका माता मंदिंरांमध्ये होत आहे.