विद्यार्थी प्रश्नांवर युवा सेना आक्रमक
By admin | Published: March 2, 2017 12:48 AM2017-03-02T00:48:47+5:302017-03-02T00:48:47+5:30
पारोळा चौफुली येथे चक्काजाम : शासकीय तंत्रनिकेतन, कृषी विद्यापीठ प्रश्न अधिवेशनात मार्गी लावा
धुळे : कृषी विद्यापीठ, शासकीय तंत्रनिकेतन व विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विविध प्रश्नांवर आक्रमक आंदोलन युवा सेनेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. वरील प्रश्न येत्या अधिवेशनात तत्काळ मार्गी लावावेत, या मागणीसाठी कृषी महाविद्यालयासमोरील पारोळा चौफुली येथे युवा सेनेच्या वतीने बुधवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन केले.
प्रलंबित प्रश्नांचे काय?
कृषी विद्यापीठाचा प्रलंबित निर्णय मार्गी लावून हे विद्यापीठ धुळ्यात झाले पाहिजे. शासनाने शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. हा निर्णय ताबडतोब मागे घेण्यात यावा, तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उपकेंद्रासाठी देवपूरमधील सर्व्हे नं.१११ व ११२ या जागेचा ठराव फेटाळण्यात आला आहे. याचा युवा सेनेतर्फे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. उपकेंद्रासाठी पुन्हा ठराव करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
एवढी जागा कुणाकडेच नाही
देवपूर येथील शासकीय तंत्रनिकेतनकडे भरपूर जागा उपलब्ध आहे. एवढी जागा कोणत्याही शासकीय तंत्रनिकेतनकडे नाही. त्यामुळे हे तंत्रनिकेतन बंद न करता या ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयही सुरू करावे. यासंदर्भात लेखी आदेश तत्काळ प्रशासनाला पाठवावेत, अशी मागणी केली.
यापुढे तीव्र आंदोलन
जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, येणाºया पिढीला शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रलंबित शैक्षणिक प्रश्न मार्गी लावावेत. येत्या ६ तारखेपासूनच्या अधिवेशनात हे प्रश्न घेऊन मार्गी लावावेत. प्रश्न मार्गी न लावल्यास शासनाच्या विरोधात भविष्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे साखळी आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येईल.
तसेच वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमक आंदोलने करण्याचा इशाराही देण्यात आला. या वेळी जिल्हा युवा अधिकारी पंकज गोरे, युवती अधिकारी ऐश्वर्या अग्रवाल, शहर युवा अधिकारी संदीप मुळीक, देवपूर अधिकारी हरीश माळी, उपशहर युवा अधिकारी मनोज जाधव, जितेंद्र पाटील, आकाश शिंदे, मनीष पाटील अमित खंडेलवाल, नितीन मराठे, दीपक देसले, विभाग अधिकारी स्वप्नील सोनवणे, नीलेश चौधरी, अमोल पटवारी, खुशाल ठाकूर, भूषण चौधरी, नैलेश ऋणवाल, महाविद्यालय अधिकारी मयूर बागुल, पराग कुलकर्णी, बिपीन बडगुजर, अजिंक्य मराठे, विनायक आवळकंठे, योगेश मराठे, सागर मोरे, युवा सेना पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.