गुंगीकारक औषधांच्या साठ्यासह तरुण गजाआड
By देवेंद्र पाठक | Updated: July 15, 2024 21:29 IST2024-07-15T21:29:25+5:302024-07-15T21:29:36+5:30
धुळ्यातील वरखेडी रोडवरील घटना

गुंगीकारक औषधांच्या साठ्यासह तरुण गजाआड
धुळे : शहरातील वरखेडी रोडवरील महापालिकेच्या कचरा डेपो जवळील परिसर नशेखोरांचा अड्डा बनला आहे. या भागात सायंकाळनंतर गवत, झुडुपांच्या आडोश्याला नशेखोर नजरेस पडतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या भागात पेट्रोलिंग सुरू केली आहे. यातच शनिवारी रात्री गुंगीकारक औषध साठा बाळगणाऱ्या तरुणास आझादनगर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून २ हजार ८०० रुपये किमतीचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आझादनगर पोलिसांनी समीर शाह सलीम शाह (वय २३, रा. रामदेवबाबा नगर, ऐंशी फुटी रोड, धुळे) यास पकडले. त्याच्या कब्ज्यातील बॅगेत २ हजार ८०० रुपये किमतीचा मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गुंगीकारक औषधींच्या २० बाटल्यांचा साठा मिळून आला. त्याच्याकडे औषधी खरेदीचे कोणतेही बिल, डॉक्टरांचे प्रिसक्रिप्शन, विक्री परवाना, वैद्यकीय क्षेत्राचे ज्ञान, पदवी नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गैरकायदेशीर मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने औषधसाठा बाळगल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोकॉ अनिल रमेश शिंपी यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित समीर शाह सलीम शाह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.