पिंपळनेरचा तरुण ठरला हनी ट्रॅपचा शिकार; चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल
By अतुल जोशी | Published: June 21, 2023 06:13 PM2023-06-21T18:13:42+5:302023-06-21T18:13:53+5:30
कानपूर येथील तरुणीसह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल
धुळे : पिंपळनेर येथील एका २७ वर्षीय तरुणाशी सोशल मीडियावर ओळख करून, तरुणीने त्याला वेगवेगळे प्रशंसनीय मेसेज करून तरुणाकडून मोबाइल रिचार्जसाठी १७२० रुपये उकळले. तसेच इतर खर्चासाठी मोबाइलवर पैशांची मागणी करणाऱ्या कानपूर (उत्तर प्रदेश) येथील एका तरुणीसह चौघांविरुद्ध पिंपळनेर पोलिसात २० जून २३ रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपळनेर येथील एका २७ वर्षीय तरुणाची उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका तरुणीशी सोशल मीडियावर ओळख झाली. तरुणीने त्या तरुणाला ‘मुझे आपके रिल्स बहुत अच्छे लगते है, आपका लूक बहुत अच्छा है, आप बहुत हॅन्डसम हो’ असे प्रशंसनीय मेसेज केले. त्यानंतर त्या दोघांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. हा प्रकार मार्च २०२२ ते ८ जून २०२३ दरम्यान घडला. दरम्यान, ही संधी साधून तरुणीसह तिच्या नातेवाइकांनी तरुणाकडे मोबाइल रिचार्ज व इतर खर्चासाठी पैशांची मागणी सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचा प्रकार तरुणाच्या लक्षात आला. त्याने पिंपळनेर पोलिस स्टेशन गाठून आपबिती कथन केली. तरुणाच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसात कानपूर (उत्तर प्रदेश) येथील तरुणीसह तिचे नातेवाईक अशा चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.