विरदेल येथील जिल्हा परिषद शाळा पाडल्याप्रकरणाची चौकशी करणार
By अतुल जोशी | Published: July 11, 2023 06:10 PM2023-07-11T18:10:41+5:302023-07-11T18:10:53+5:30
शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील जिल्हा परिषदेची एक वर्गखोली कुठलीही परवानगी न घेता निर्लेखित करण्यात आलेली आहे.
धुळे : निर्लेखनाचे आदेश नसतानाही शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील जिल्हा परिषद शाळेची एक खोली परस्पर पाडण्यात आली. याची दखल जिल्हा परिषदेने घेतलेली आहे. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी स्थायी समितीत हा मुद्दा उपस्थित केला असता,प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सभागृहात सांगितले.‘निर्लेखनाचे आदेश नसताना विरदेल जि.प. शाळेची वर्ग खाेली पाडली!’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेण्यात आली. जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली.
शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील जिल्हा परिषदेची एक वर्गखोली कुठलीही परवानगी न घेता निर्लेखित करण्यात आलेली आहे. यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. या शाळा खोलीचे वृत्त प्रसिद्ध हाेताच जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी स्थायी समितीत हा मुद्दा उपस्थित केला. विरदेल येथील शाळा खोली निर्लेखित करण्याचे आदेश दिले होते का? अशी विचारणा त्यांनी शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांच्याकडे केली असता, निर्लेखाच्या यादीत या शाळा खोलीचे नाव होते. मात्र प्रस्ताव आलेला नव्हता. त्या शाळा खोलीचे निर्लेखन मंजूर झालेले नसताना ती परस्पर पाडण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले. दरम्यान असे प्रकार होणार नाहीत याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी सूचनाही देवेंद्र पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केली.